५ लाखांपर्यंत मोफत उपचार कागदावरच; उपचारासाठी कर्जाचीच वेळ, अंमलबजावणी कधी?
By संतोष हिरेमठ | Published: August 29, 2023 01:15 PM2023-08-29T13:15:53+5:302023-08-29T13:17:13+5:30
अंमलबजावणीची प्रतीक्षाच, रुग्णालयांमध्ये वादाच्या घटना
छत्रपती संभाजीनगर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखांपर्यंत मोफत उपचार करण्याची घोषणा करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळात तसा निर्णय घेण्यात आला. शासन निर्णयही निघाला. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणीच होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याची, कर्ज काढण्याचीच वेळ अनेकांवर ओढवत आहे.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता पाच लाखांपर्यंत उपचार करता येणार असल्याचे मार्चच्या प्रारंभी जाहीर करण्यात आले. या योजनेत विमा संरक्षण १.५० लाखाहून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. जुलैअखेर शासन निर्णयही जाहीर करण्यात आला. प्रत्यक्षात अद्यापही दीड लाखाचेच विमा संरक्षण मिळो. ‘लोकमत’ने घाटी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयातील या योजनेच्या कक्षाला भेट देऊन माहिती घेतली. तेव्हा अद्याप अंमलबजावणी सुरू झाली नसल्याचे सांगण्यात आले. जनआरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला.
जिल्ह्यात किती रुग्णालये संलग्नित?
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ३८ रुग्णालये एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नित आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये या योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येतो.
नातेवाइकांना वाटते रुग्णालयेच करतात अडवणूक
म. फुले जनआरोग्य योजनेत ५ लाखांपर्यंत वाढ करण्यात आल्याची सूचना रुग्णालयांना करण्यात आलेली आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. कोणत्या पॅकेजमध्ये किती वाढ झाली, हे स्पष्ट नाही. रुग्णांच्या नातेवाइकांना वाटते की, रुग्णालये अडवणूक करतात. त्यातून वादही होतात. मात्र, रुग्णालये सहकार्य करतात. सर्व प्रक्रिया आरोग्य मित्र करीत असतात.
- डाॅ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असोसिएशन
५ महिन्यांत किती जणांवर उपचार?
जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट (आतापर्यंत) १४ हजार ४०७ लाभार्थ्यांनी मोफत उपचारांचा लाभ घेतला. यासाठी ७४ कोटी ८० लाख ४२ हजार ६०५ रुपयांचे उपचार मंजूर करण्यात आले.
- योजनेत समाविष्ट उपचार संख्या- १,३५६
- केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव उपचार-११९
- राज्यातील अंगीकृत रुग्णालयांची संख्या-१,३५०