जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:27 PM2018-10-31T23:27:26+5:302018-10-31T23:28:00+5:30

वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारा डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा अर्ज (आयए) सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर, न्या. अब्दुल नजीर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने बुधवारी (दि. ३१) फेटाळला.

Free the way to release water in Jaikwadi | जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

googlenewsNext
ठळक मुद्दे नगरच्या याचिका फेटाळल्या : निळवंडेसह इतर वरच्या धरणांतून उद्या पाणी येणार


औरंगाबाद : वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारा डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा अर्ज (आयए) सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर, न्या. अब्दुल नजीर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने बुधवारी (दि. ३१) फेटाळला. परिणामी निळवंडेसह वरच्या इतर धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान निळवंडेसह वरच्या धरणांतून उद्या सकाळी आठ वाजता पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या येथील अधिकाऱ्यांनी दिली.
कोणत्याही धरणातील पाण्याचा साठा ६५ टक्क्यांच्या खाली गेल्यास पाणी वाटप समितीच्या (एमडब्ल्यूआरआरए) मार्गदर्शक तत्त्वानुसार वरच्या धरणांतून त्या धरणात पाणी सोडले जाते. त्यानुसार १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या पाहणीत जायकवाडी धरणात केवळ ३६.६३ टक्के पाणीसाठा असल्याचे आढळले होते. म्हणून गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी २३ आॅक्टोबर रोजी वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश दिला होता.
या निर्णयाविरुद्ध अहमदनगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना आणि कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज (आयए) दाखल करून त्यांच्या परिसरात कमी पाऊस पडल्यामुळे उसासाठी पाणी हवे. वरच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, अशी विनंती केली होती. त्यापैकी डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा अर्ज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.
विखे साखर कारखान्यातर्फे ज्येष्ठ वकील शेखर नाफडे, संजीवनी कारखान्यातर्फे अ‍ॅड. एम. वाय. देशमुख, गोदावरी महामंडळातर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण, अ‍ॅड. व्ही. कृष्णमूर्ती आणि अ‍ॅड. प्रशांत पद्मनाभन यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. चैताली चौधरी-कुट्टी यांनी सहकार्य केले. महाराष्टÑ शासनातर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल नाडकर्णी यांनी काम पाहिले.

Web Title: Free the way to release water in Jaikwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.