चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे
By प्रशांत तेलवाडकर | Published: March 3, 2023 07:59 PM2023-03-03T19:59:19+5:302023-03-03T20:00:06+5:30
माजी विद्यार्थ्यांकडून ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव; रंगमंचावर साकारलेल्या गावातील वडाच्या झाडाखालील पारावर प्रा. दिलीप महालिंगे यांची प्रा. ऋषिकेश कांबळे आणि प्रा. सुनील पाटील यांनी मुलाखत घेतली
छत्रपती संभाजीनगर : आता चार भिंतींच्या वर्गातून मी मुक्त झालो आहे... माझ्या उर्वरित आयुष्याचे लक्ष्य आता नाट्यक्षेत्राला आणि विद्यार्थ्यांमधील दडलेल्या कलाकारांना जागविणे व त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात उंच शिखरावर पोहोचविणे हेच राहणार आहे. यामुळे कलाकार जमवायचे, नाटक, एकांकिका बसवायच्या आणि ते दाखवत गावोगाव मनसोक्त भटकायचे. लोककलेचा प्रसार-प्रचार करायचा, असे आयुष्यातील उत्तरार्धातील नियोजन सेवानिवृत्त प्रा. दिलीप महालिंगे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव केला. एखादा प्राध्यापक सेवानिवृत्त होत असताना मागील ३० वर्षांतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या कृतज्ञतेसाठी आठवडाभरात ‘ऋणानुबंध’ व ‘जागर माणूसपणाचा’ असे दोन कार्यक्रम घेण्याची बहुतेक राज्यातील पहिलीच वेळ असेल. असे हे भाग्यवान प्राध्यापक म्हणजे विवेकानंद महाविद्यालयातील प्रा. दिलीप महालिंगे आहेत. २८ फेब्रुवारीला ते सेवानिवृत्त झाले.
महाकवी वामनदादा कर्डक यांचे सान्निध्य लाभलेले प्रा. महालिंगे सरांनी मागील ३५ वर्षांत हजारो विद्यार्थांना ज्ञानदान दिले, शेकडो कलाकार घडविले, त्या माजी विद्यार्थांनी मिळून स्वखर्चातून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, महालिंगे सरांनी गॅदरिंग असो, युथ फेस्टिव्हल असो, त्यानिमित्ताने बसविलेल्या एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, लावणी, वगनाट्य माजी विद्यार्थ्यांनी तेवढ्याच ताकदीने यावेळी सादर केले. दोन्ही कार्यक्रमांत तापडिया नाट्यमंदिर हाऊसफुल्ल होते. मुख्य प्रवेशद्वारापासूनच हलगीच्या जोरदार वादन व विद्यार्थ्यांनी नृत्य करून जल्लोष केला. स्टेजवर साकारलेल्या पारावर बसून प्रा. महालिंगे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या ते त्यांचे मित्र प्रा. ऋषिकेश कांबळे व प्रा. सुनील पाटील यांनी. ज्यांनी आपल्यावर वडिलांसारखे प्रेम केले, नाट्यक्षेत्रातील ‘अ, ब, क, ड’ शिकविले, त्या प्रा. महालिंगे सरांमधील ‘माणूसकी’चे विविध पैलू या गप्पांमधून नव्याने समोर आले.
तृतीयपंथींना नायक बनविले
या देशातील पुरुष व स्त्री राज्यकर्ते म्हणून निष्क्रिय ठरले. यामुळे आता तृतीयपंथींच्या हातात सत्ता द्या, ते देश चांगला चालवतील, कारण, भ्रष्ट्राचार करून नेत्यांचे पोट पुढे येतात; पण तृतीयपंथीच्या पुढे कोणी नाही आणि पाठीमागेही कोणी नाही, त्यामुळे पोट पुढे यायचे कारण नाही. मग ते राजकारण जनतेसाठीच करणार, अशा क्रांतिकारक विचारांची ‘लोकतंत्र हाय हाय’ ही एकांकिका बसविली. ती एकांकिका युथ फेस्टिव्हलच नव्हे तर देशपातळीवर गाजली. यात खऱ्या अर्थाने तृतीयपंथींना ‘नायक’ केले, असेही प्रा. महालिंगे यांनी आवर्जून नमूद केले.