स्वातंत्र्यसंग्राम स्मारकाचे आज होणार लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:19 AM2017-11-04T01:19:28+5:302017-11-04T01:19:41+5:30
क्रांतीचौक येथील भव्य अशा ध्वजस्तंभ तथा ‘स्वातंत्र्यसंग्राम’ स्मारकाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी ५ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : क्रांतीचौक येथील भव्य अशा ध्वजस्तंभ तथा ‘स्वातंत्र्यसंग्राम’ स्मारकाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी ५ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती ध्वजस्तंभ समितीचे राम भोगले, मानसिंह पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, खा. रावसाहेब दानवे, खा.राजकुमार धूत, आ. विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, अब्दुल सत्तार, प्रशांत बंब, हर्षवर्धन जाधव, संदीपान भुमरे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
उद्योजक राम भोगले म्हणाले, एप्रिल २०१६ मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी ध्वजस्तंभासंदर्भात शहरातील अधिका-यांनी पहिली बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्यानंतर जागेचा शोध घेऊन क्रांतीचौकातील जागा समितीने निश्चित केली. जुलै २०१६ पासून स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. स्मारकाच्या जागेपासून काही अंतरावर छत्रीसारखा काला चबुतरा होता. खुल्या मैदानावर तटबंदी लावण्यात आल्याप्रमाणे असलेली ही जागा खाजगी मालकीच्या नावावर होती, त्यामुळे त्या जागेचा प्रश्नच येत नाही, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. ध्वजस्तंभासाठी अडीच कोटी रुपये पूर्णत: लोकसहभागातून उभारण्यात आले आहेत. १८ शाळांमधील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५० रुपयांचा निधी गोळा करण्यात आला.