क्रेडीट कार्ड अपग्रेडच्या नावाखाली वारंवार विचारला ओटीपी; थोड्यावेळात समजले सव्वालाख गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 03:50 PM2022-05-05T15:50:04+5:302022-05-05T15:50:46+5:30
तब्बल सात वेळा ओटीपी विचारून सायबर भामट्याने हातोहात ही रक्कम लांबवली.
कन्नड ( औरंगाबाद): तुमचे क्रेडिट कार्ड जुने झाले असून ते अपग्रेड करण्यासाठी ओटीपी सांगा अशी थाप मारून सायबर भामट्याने तब्बल १ लाख ३६ हजार ९३५ रुपयांची रक्कम ऑनलाईन लंपास केली. तब्बल सात वेळा ओटीपी विचारून भामट्याने हातोहात ही रक्कम लांबवली. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सायबर क्राईमने तक्रार कन्नड शहर पोलीस ठाण्यात वर्ग केली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि राजीव तळेकर पुढील तपास करीत आहेत.
शहरातील दत्त कॉलनीतील कृष्णा एकनाथ बोडखे हे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गराडा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नौकरीस आहे. त्यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे क्रेडीट कार्ड आहे. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता शिक्षक कृष्णा बोडखे यांना त्यांच्या मोबाईलवर हिंदी भाषिकाचा फोन आला. मी एसबीआय क्रेडीट कार्डच्या ऑफिसवरून बोलतो तुमचे क्रेडिट कार्ड जुने झाले आहे. सदर कार्ड हे सुरक्षिततेसाठी अपग्रेड करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रेडीट कार्डची माहीती द्यावी लागेल. त्यानुसार शिक्षक कृष्णा बोडखे यांनी त्याला क्रेडीट कार्ड क्रमांक व जन्म तारीख सांगितली. त्यानंतर तुमची कार्ड लिमीट ब्लॉक करावी लागेल त्याच्यासाठी तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर बोडखे यांनी त्यांना आलेला ओटीपी सांगितला.
मात्र, ओटीपी मॅच होत नाही असे सांगून पुन्हा पुन्हा ओटीपी सांगितला तोही मॅच झाला नसल्याचे त्याने सांगितले. असे एकूण सात वेळा ओटीपी पाठवले. त्यानंतर त्याने सांगितले की, तुमचे कार्ड लिमीट ब्लॉक झाले आहे. चोवीस तासानंतर तुमच्या एसबीआय कार्ड लॉग इनला रिफ्रेश होईल असे सांगितले. त्यानंतर तुमच्या पत्त्यावर नवीन क्रेडिट कार्ड येवून जाईल असे म्हणून त्याने फोन कट केला. शिक्षक कृष्णा बोडखे यांच्या मोबाईलवर रुपये ९९ हजार ९३५, १२ हजार व ५ हजार रु चे ५ वेळा असे एकूण ७ वेळा व्यवहार झाल्याचे संदेश आले. एकूण १ लाख ३६ हजार ९३५ रुपयांची फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.