तीसगावात मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:57 PM2019-01-22T21:57:35+5:302019-01-22T21:57:54+5:30
ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने ५० पेक्षा अधिक अतिक्रमण काढले.
वाळूज महानगर : अतिक्रमणधारकांना वारंवार नोटिसा बजावूनही अतिक्रमण काढले जात नसल्याने तीसगाव ग्रामपंचायतीने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने ५० पेक्षा अधिक अतिक्रमण काढले. अनेक वर्षांनंतर गावातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
गावातील मुख्य रस्त्यावर दुतर्फा १०० पेक्षा अधिक लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, दुरावस्थाही झाली आहे. ग्रामपंचायतीने रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ता गुळगुळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ४२ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. रस्ता कामात अतिक्रमण अडथळा ठरत असल्याने नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले; परंतुसंबंधित अतिक्रमित मालमत्ताधारकांकडून नोटिसीला प्रतिसाद दिला जात नाही.
त्यामुळे ग्रामपंचायतीने मंगळवारी पोलीस बंदोबस्तात रस्त्यावरील अतिक्रमण काढायला सुरुवात केली. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवायला सुरुवात केली. दिवसभरात ग्रामपंचायतीने मुख्य रस्त्यावरील जवळपास ३५ ते ४० मालमत्ताधारकांचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढले. काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. उर्वरित अतिक्रमण बुधवारी (दि.२३) काढण्यात येणार असल्याचे सरपंच कौशल्याबाई कसुरे व ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांनी सांगितले.
अतिक्रमणासह दुरावस्था
दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याने रस्त्याचा श्वास कोंडला आहे. शिवाय रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. अरुंद व खराब रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, चारचाकी वाहने एकमेकांना पास होत नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत होती.