मित्रांनी फोन करून तरुणास बोलावून घेतले; काही वेळाने नातेवाईकांना थेट मृतदेहच मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:33 IST2025-02-03T13:32:13+5:302025-02-03T13:33:08+5:30
या प्रकरणी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे.

मित्रांनी फोन करून तरुणास बोलावून घेतले; काही वेळाने नातेवाईकांना थेट मृतदेहच मिळाला
छत्रपती संभाजीनगर : मित्रांसोबत काही तरुण गोंधळ घालत असल्याचे डायल ११२ वर कळविण्यात आले. पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. त्यांना समज देत माफीनामा लिहून घेतल्यानंतर सोडून दिले. त्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे.
कल्पेश विजय रुपेकर (२४, रा. क्रांतीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आरोपींमध्ये वैभव मालोदे, वैभव गिरी, प्रेम तिनगोटे आणि सौरभ भोले यांचा समावेश आहे. मृताचे भाऊ अविनाश रुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सायंकाळी कल्पेश याला काही मित्रांनी फोन करून बोलावून घेतले. तो मित्रासह शहरातील एका हॉटेलमध्ये गेला. हॉटेलसमोर त्याची दुचाकी लावली होती. त्यानंतर त्याचे मित्र त्याला घेऊन शहरातील विविध ठिकाणी फिरले. क्रांती चौक पोलिस ठाण्यातील ११२ वर रात्री दीड वाजेच्या सुमारास काही तरुण संसारनगर भागात गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाव घेतली. पण तेथे कोणीही आढळले नाही.
त्यानंतर काही वेळाने पुन्हा डायल ११२ वर कॉल आला. त्यात तरुण शिवीगाळ करीत असल्याचे सांगितले. पोलिस पुन्हा घटनास्थळी गेले. तेव्हा रुपेकरसह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या तरुणांना ठाण्यात आणले. समज देऊन त्यांचा माफीनामा लिहून घेत पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास सोडून दिले. हे तरुण पोलिस ठाण्याच्या बाहेर गेल्यानंतर काही वेळाने सोबतच्या तरुणांनी कल्पेशला घाटी रुग्णालयात दाखल केले. तसेच घटनेची माहिती क्रांतीनगरमधील संबंधितांना दिली. तोपर्यंत कल्पेशचे मित्र त्याला सोडून पसार झाले होते. घाटीत डॉक्टरांनी तपासून कल्पेशला मृत घोषित केले.
नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी
नातेवाईकांनी कल्पेशचा खून सोबतच्या तरुणांनीच गळा आवळून केल्याचा आरोप केला आहे. मृताचे आई-वडील, भाऊ, बहिणींसह इतर नातेवाईकांनी घाटीमध्ये गर्दी केली होती. त्याच्या चेहऱ्यासह, गळ्यावर मारहाणीचे व्रण असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.