मारहाणीत मित्राचा मृत्यू ; सदोष मनुष्य वधाच्या आरोपाखाली दोघांना सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 06:41 PM2019-04-30T18:41:55+5:302019-04-30T18:43:26+5:30
लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने झाला मृत्यू
औरंगाबाद : महेबूब गौरी (१७) या मुलाचा आरोपींनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. महेबूबला मारहाण करणारे प्रशांत केशवराव म्हस्के (३६, रा. न्यू नंदनवन कॉलनी) आणि प्रमोद जयवंतराव निर्मल (३२, रा. शिवूर, ता. वैजापूर) या दोघांना सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ‘सदोष मनुष्यवधाच्या’ आरोपाखाली भादंवि कलम ३०४ (रोमन-दोन) अन्वये प्रत्येकी साडेचार वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.
यासंदर्भात महेबूबचे वडील अॅड. गुजरशाह अली गौरी (४७, रा. देवगिरी कॉलनी, क्रांतीचौक) यांनी तक्रार दिली होती की, ३१ डिसेंबर २०१५ रोजी महेबूब गौरी हा प्रशांत म्हस्के, प्रमोद निर्मल व तीन मैत्रिणींसह नववर्षाच्या पार्टीसाठी बीड बायपास येथील एका हॉटेलात गेले होते. तेथे महेबूब व दोघे आरोपी दारू प्याले. महेबूबला दारू जास्त झाल्याने आरोपींनी त्याला घराजवळ सोडले. तसेच महेबूबच्या मैत्रिणीलासुद्धा आरोपींनी घरी सोडले.
त्यानंतर आरोपी व त्यांच्या दोन मैत्रिणी बसस्थानकासमोरील एका लॉजमध्ये गेले. महेबूबला त्याची मैत्रीणदेखील आरोपींसोबत असल्याचा संशय आला. तो त्यांच्यापाठोपाठ लॉजवर गेला. तेथे त्याने आरोपींकडे त्याच्या मैत्रिणीबाबत विचारपूस केली असता आरोपींनी त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. बेशुद्ध अवस्थेत आरोपींनी त्याला लॉजवरील जनरल रूममध्ये ठेवले. महेबूब हालचाल करीत नसल्याने लॉजच्या व्यवस्थापकाने दोघा आरोपींना सांगितले व त्याला घाटी दवाखान्यात दाखल करण्यास सांगितले.
त्यानुसार आरोपींनी महेबूबला घाटी दवाखान्यात नेले. समर्थनगर येथील मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी गेलो असता तेथे अज्ञात मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला दवाखान्यात आणल्याचे आरोपींनी सांगितले. त्यावरून एमएलसी दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता वरील सर्व घटना उघडकीस आली. यासंदर्भात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी २२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात मयताची मैत्रीण, लॉजचे कर्मचारी व सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने दोन्ही आरोपींना वरीलप्रमाणे शिक्षा व दंड, प्रशांत म्हस्के याला कलम २०१ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि कलम १८२ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड ठोठावला.