किशोरवयीन मुलांच्या समस्या समजून घेणारा मैत्री क्लब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:07 AM2021-03-13T04:07:20+5:302021-03-13T04:07:20+5:30

आरोग्य विभागाच्या वतीने २०१४ पासून अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सुरू झाला आहे. याअंतर्गत शहरात तसेच खेडोपाडी ...

A friendship club that understands the problems of teenagers | किशोरवयीन मुलांच्या समस्या समजून घेणारा मैत्री क्लब

किशोरवयीन मुलांच्या समस्या समजून घेणारा मैत्री क्लब

googlenewsNext

आरोग्य विभागाच्या वतीने २०१४ पासून अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सुरू झाला आहे. याअंतर्गत शहरात तसेच खेडोपाडी राहणाऱ्या मुलांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात आणि त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे म्हणाले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोकळेपणाने बोलता येत आहे. ज्या गोष्टी ते पालकांसोबत बोलू शकत नाहीत, त्या गोष्टी ते त्यांचे ताई किंवा दादा वाटणाऱ्या समुपदेशकांना मुक्तपणे सांगत आहेत. समुपदेशन करताना गोपनीयतेची पूर्णपणे काळजी घेतली जात असल्याने आणि मुलगा किंवा मुलगी व समुपदेशक या दोघांमध्येच चर्चा होत असल्याने मुले कोणताही आडपडदा न ठेवता मनातल्या गोष्टींना वाट करून देत आहेत.

चौकट :

एप्रिल ते नोव्हेंबर २०२० मध्ये आलेल्या तक्रारी- २९,४०३

यापैकी मुलींच्या तक्रारी- १५,०७५, मुलांच्या तक्रारी- १४, ३२८

चौकट :

लॉकडाऊननंतर

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागात किशोरवयीन मुला-मुलींसाठी अनेक उपक्रम राबविले जातात; परंतु लॉकडाऊन, काेरोना यामुळे या प्रक्रियेत मोठा खंड पडला आहे. पुन्हा एकदा नव्या दमाने कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. परंतु काेरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने कार्यक्रमांच्या आयोजनावर मर्यादा आली आहे.

चौकट :

जानेवारी ते मार्च २०२१ या काळात आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शहर आणि ग्रामीण भागात मिळून एकूण ४९८ कार्यक्रम घेण्याचा विचार होता. मात्र, कोरोनामुळे येणाऱ्या अडचणी पाहता हे सर्व कार्यक्रम पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे होऊ शकतील, याबाबत साशंकता आहे.

चौकट :

जिल्ह्यात किती आरोग्य केंद्रे

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात मिळून एकूण ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये असणाऱ्या मैत्री क्लबच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींचे समुपदेशन केले जाते. एकूण ७ समुपदेशकांअंतर्गत कार्य करतात. या उपक्रमासाठी १०४ या क्रमांकाची हेल्पलाईनही बनविली आहे.

चौकट :

किशोरवयीन मुलांच्या तक्रारी

- किशोरवयात शरीरात होणारे विविध बदल मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत असतात. त्यामुळे शारीरिक बदलांशी संबंधित अनेक प्रश्न विद्यार्थ्यांकडून समुपदेशकांना विचारले जातात.

- मैत्री क्लबच्या माध्यमातून किशोरवयीन मुली सर्वांत जास्त प्रश्न मासिक पाळीसंदर्भात विचारतात. ग्रामीण भागात याबाबत पालकांशी मनमोकळेपणाने बोलण्याची सोय नसल्याने अनेक मुलींना समुपदेशकांचा आधार वाटतो.

- याशिवाय वाढते वजन, केस गळणे, अभ्यास न होणे, एकाग्रता, चेहऱ्यावर वाढणारे पिंपल, कमी उंची यासारखे अनेक प्रश्न मुलांकडून विचारले जातात.

Web Title: A friendship club that understands the problems of teenagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.