‘डेटिंग ॲप’वरून मैत्री, नंतर ब्लॅकमेल; इंजिनियर तरुणी खंडणी स्वीकारताना रंगेहाथ अटकेत
By सुमित डोळे | Published: November 25, 2023 06:15 PM2023-11-25T18:15:26+5:302023-11-25T18:16:04+5:30
तरुणी कुटुंबाच्याही फार संपर्कात नसल्याचे चौकशीत समोर आले असून तिच्या मित्राचा देखील ब्लॅकमेलिंगमध्ये सहभागी होता
छत्रपती संभाजीनगर : डेटिंग ॲप 'टिंडर' वरून व्यावसायिकासोबत मैत्री करून तिने आधी विश्वास जिंकला. सुरुवातीला गोड बोलून हजारात पैसे घेतले. व्यावसायिकही देत गेला. मात्र, दोघांमधील खासगी क्षणांचे रेकॉर्डिंग करून तिने ब्लॅकमेलिंग सुरू केले. व्यावसायिकाने ५ लाख रुपये देऊनही तिने पुन्हा पैशांची मागणी सुरू केल्याने व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून स्वाती विष्णूकांत केंद्रे (रा. दर्गा रोड, प्लॉट क्र ३, सातारा) हिला खंडणी स्वीकारताना गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक केली.
टाऊन सेंटरमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय बांधकाम व्यावसायिकासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. मे २०२३ मध्ये डेटिंग ॲप 'टिंडर'वरून त्यांची स्वातीसोबत ओळख झाली होती. सुरुवातीला ॲपद्वारेच मेसेजद्वारे बोलणे झाल्यानंतर मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण झाली. दोनच दिवसांत स्वातीने व्यावसायिकाला भेटण्यासाठी बोलावले. नवरा कामानिमित्त सतत बाहेर असल्याने मला चांगला मित्र हवा असल्याचे सांगून तिने मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. मैत्री वाढली व स्वातीने कारणे सांगून, खोटे नाटक करून पैशांची मागणी सुरू केली. व्यावसायिक देखील ५०-६० हजारांपर्यंत पैसे देत गेला.
दिवाळीत नवे नाटक
सहा महिने समंजस, हुशारपणे वागलेल्या स्वातीने दिवाळीत नवे नाटक रचले. 'माझ्या नवऱ्याला आपल्या ओळखीबाबत कळाल्याने आमच्यात वाद होऊन त्याने मला व्यवसायासाठी दिलेले ५ लाख परत मागितले. आता तू ५ लाख दे, नसता तुझ्या आईवडिलांना आपल्या संबंधाबाबत सांगेन', असे व्यावसायिकाला धमकावले. ऐन दिवाळीत स्वातीचे बदललेले रंग पाहून व्यावसायिकाच्या पायाखालची जमीन सरकली. बदनामी टाळण्यासाठी त्याने कलाग्रामजवळ तिला बोलावून ३ लाख रोख दिले. ७५ हजार ऑनलाइन, २५ हजार बँक खात्यावर पाठवले.
मग अपेक्षा वाढत गेली
४ लाख घेऊन स्वातीने ‘यानंतर त्रास देणार नाही, पैसे मागणार नाही‘, असे बॉण्डवर लिहून दिले. मात्र, व्यावसायिक घाबरल्याचे तिला पक्के समजले हाेते. तिने पुन्हा ‘व्हिडीओ व्हायरल करेन, एक तर लग्न कर नसता ११ लाख दे’ अशी मागणी केली. घाबरलेल्या व्यावसायिकाने थेट एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडे तक्रार केली. पातारे, उपनिरीक्षक आत्माराम घुगे, अमोल सोनवणे, महिला कर्मचारी कोमल तारे यांनी गुरुवारी दुपारी मॉस्को कॉर्नरला सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा पिशवीत ठेवून त्यावर ५००च्या खऱ्या नोटा ठेवल्या. २:०० वाजता स्वाती आली. तिने पैसे स्वीकारताच व्यावसायिकाने इशारा केला व दबा धरून बसलेल्या पोलिसांनी स्वातीला अटक केली.
मित्राचीही स्वातीला साथ
मूळ नांदेडच्या स्वातीने शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिलची पदवी घेतली आहे. तिची बिल्डर ताहेर पठाण (रा. सातारा) याच्यासोबत मैत्री होती. कुटुंबाच्याही ती फार संपर्कात नसल्याचे चौकशीत समोर आले. ताहेरही ब्लॅकमेलिंगमध्ये सहभागी होता. तो मात्र पसार झाला आहे. पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल सोनवणे तपास करत आहेत.