इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जाणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू; मनोज जरांगे यांचा इशारा
By संदीप शिंदे | Published: July 9, 2024 07:58 PM2024-07-09T19:58:19+5:302024-07-09T19:58:50+5:30
एकही कुणबी नोंद रद्द केली, तर २८८ उमेदवार पाडू !
लातूर : मी जातीयवादी नाही. कपटही करीत नाही. तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्हाला बोलतो. अंतरवाली सराटीत गोळीबार केला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्यांना कोणी उचलायला नव्हते. त्यासाठीच सत्तेत बसविले होते का, इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जो कोणी नेता जाईल, त्यांचा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे - पाटील यांनी येथे दिला.
मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे मंगळवारी लातुरात आगमन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित हजारोंच्या जनसमुदायासमोर जरांगे - पाटील म्हणाले, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, त्यातून कोणी राहिलेच तर त्यांनाही आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांना अर्थात मागेल त्यास प्रमाणपत्र द्यावे. सरकारने तसे आश्वासन दिले आहे.
...तर २८८ उमेदवार पाडले
एकही कुणबी नोंद रद्द केली, तर २८८ उमेदवार पाडले म्हणून समजा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो, त्यांनी छगन भुजबळांचे ऐकून काम करू नका. मराठ्यांची लेकरे अधिकारी झालेले तुम्हाला पाहावत नाही का? असा खडा सवाल उपस्थित करीत मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी सरकारला आव्हान दिले.