उद्यापासून लग्नसराईच्या धामधुमीला ब्रेक; उमेदवार, निवडणूक यंत्रणेला मोठा दिलासा
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 2, 2024 05:32 PM2024-05-02T17:32:41+5:302024-05-02T17:34:34+5:30
१३ मेरोजी मतदानाच्या दिवशी कोणताही लग्नमुहूर्त नसल्याने उमेदवारांनाच नव्हे तर निवडणूक यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे
छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात लग्नसराई असली तर उमेदवारांसाठी पर्वणीच ठरते. कारण, लग्नात हजारो मतदारांची एकाच ठिकाणी भेट होते व अप्रत्यक्षपणे प्रचारही होतो. मात्र, ऐन मतदानाच्या दिवशी जर लग्नतिथी असेल तर त्यादिवशी मतदानाची टक्केवारी घसरते. मात्र, यंदा ३ मेपासून लग्नसराईच्या धामधुमीला पुढील ५७ दिवसांसाठी ब्रेक लागणार आहे. यामुळे १३ मेरोजी मतदानाच्या दिवशी कोणताही लग्नमुहूर्त नसल्याने उमेदवारांनाच नव्हे तर निवडणूक यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे.
मे महिन्यात दोनच लग्नतिथ्या
पुढील ‘मे’ महिनाभरात दोनच लग्नतिथ्या पंचांगात देण्यात आल्या आहेत. यात १ व २ मे या दोन तिथ्या आहेत. ३ मेपासून लग्नमुहूर्त नाहीत. थेट २९ जूनलाच पुढील मुहूर्त आहे. यामुळे तब्बल ५७ दिवस लग्नमुहूर्त नाहीत.
तीन वर्षांत मे महिन्यात किती लग्नतिथी?
वर्ष व तारीख
मे २०२३ : २ व १२
मे २०२४ : १ व २
मे २०२५ : १, ५, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, १६, १७, २०, २३, २४
नवरदेव-नवरी येतात मतदानाला; वऱ्हाडींचे काय?
मतदानाच्या दिवशी लग्न असेल तर नवरदेव-नवरी मतदानासाठी येतात. त्याचा मोठा गाजावाजा केला जातो; पण त्यांच्या लग्नाला आलेले वऱ्हाडी, केटरर्सकडील काम करणारा मोठा फाैजफाटा यांचे काय? त्यातील किती जण मतदान करतात, हा प्रश्न आहे. मात्र, यंदा १३ मेरोजी मतदानाच्या दिवशीच नव्हे तर त्याच्या आसपासच्या तारखांनाही लग्नतिथी नसल्याने मतदानाची टक्केवारी वाढू शकते.
लग्न, मौंजीत प्रचार
मात्र, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत उमेदवारांनी अनेक मंगल कार्यालयांत जाऊन लग्न सोहळ्यांना भेट दिली. उपनयन संस्कार सोहळ्यांतही हजेरी लावून अप्रत्यक्ष प्रचार करीत संधीचे सोने केले.
प्रचार यंत्रणेवरील ताण कमी
राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, यंदा १३ मेरोजी सोमवारी लग्नतिथी नाही. यामुळे प्रचार यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. नाही तर लग्नसराईतून लोकांना आवाहन करून मतदान केंद्रात आणावे लागले असते. मात्र, उष्णतेची लाट असल्याने मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे, हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.