घृष्णेश्वर मंदिरासमोर छोट्या टेम्पोने दुचाकीला उडवले, एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:39 PM2021-05-24T19:39:20+5:302021-05-24T19:42:05+5:30
हा अपघात एवढा भयानक होता की, दुचाकी चालकाची कवटी फुटून मेंदू रस्त्यावर पडला होता.
खुलताबाद/वेरुळ : छाेट्या टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोलापूर- धूळे महामार्गावरील वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरासमोर सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान झाला. या अपघातात रामदास तान्हा सौंदाणे (२८, रा. सायगव्हाण, ता. कन्नड) हे मयत झाले असून, प्रदीप बाळासाहेब पाटील (३२) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील सायगव्हाण येथील रामदास तान्हा सौंदाणे व प्रदीप बाळासाहेब पाटील हे बँकेच्या कामानिमित्त औरंगाबादला दुचाकी क्रमांक (एमएच १४ जीएक्स २४४७)ने आले होते. आपले काम आटोपून ते गावी परत जात असताना, वेरुळ येथे घृष्णेश्वर मंदिरासमोर त्यांच्या दुचाकीला कन्नडहून खुलताबादकडे जाणारा छोटा टेम्पो क्रमांक (एमएच १६ एवाय ५३०९)ने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील रामदास तान्हा सौंदाणे यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रदीप पाटील हे गंभीर जखमी झाले.
हा अपघात एवढा भयानक होता की, रामदास सौंदाणे यांची कवटी फुटून मेंदू रस्त्यावर पडला होता. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, संदीप दुबे, सागर पाटील, पोलीस मित्र शांताराम सोनवणे यांनी येत वाहतूक सुरळीत केली तर बीट जमादार छत्रे, भिसे यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी वेरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पांडवे यांनी शवविच्छेदन केले. जखमी पाटील यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे.