अतिक्रमणाविरोधात परंडा पालिकेवर मोर्चा
By Admin | Published: February 28, 2017 12:49 AM2017-02-28T00:49:42+5:302017-02-28T00:54:10+5:30
परंडा : मागील काही दिवस शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली
परंडा : मागील काही दिवस शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असून, पालिका प्रशासनाने ती हटविण्याची मागणी जोर धरीत आहे. दरम्यान, शहरातील खासापुरी रोडलगत टेलिफोन आॅफिसशेजारीही अनधिकृतरित्या बांधकाम झाले असून, सदर बांधकाम तातडीने हटवावे या मागणीसाठी प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांनी सोमवारी शहरातून ढोल-ताशांच्या गजरात पालिकेवर मोर्चा काढला़ मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केले़
परंडा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधून जाणाऱ्या खासापुरी मार्गावर टेलिफोन आॅफिसच्या सुरक्षा भिंतीलगत नगर परिषदेची रिकामी जागा आहे. ही जागा नगर परिषदेने काही नागरिकांना भाडेतत्त्वावर दिलेली आहे. सदरील नागरिक नियमाप्रमाणे भाडेपट्टा भरत आहेत. सदर रस्ता हा पालखी मार्ग आहे. परिसरात माध्यमिक शाळा आहे. या मार्गावरून वाहनांची सतत रेलचेल असते. याच मार्गावरील पालिकेच्या उर्वरित जागेवर काही व्यक्तीकडून विनापरवाना अनधिकृत चार गाळ्यांचे बांधकाम करण्यात आल्याचा या भागातील नागरिकाचा आरोप आहे़ अनधिकृत व्यापारी संकुलाच्या निर्मितीमुळे येथील नागरिकांना रहदारीस अडथळा होणार आहे़ त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी हे बांधकाम त्वरित पाडावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे या नागरिकांनी दिला.
सदर निवेदनावर संभाजी मस्के, दत्तात्रय काटवटे, नारायण जाधव, सुरेश काशीद, नागेश काशीद, विशाल काशीद, अभिमान काशीद, आण्णा लोकरे, रोहन काटवटे, बंडू जाधव, अनिकेत काशीद,
संतोष काशीद, हनुमंत काशीद, अतुल काशीद, आकाश काशीद,
विनायक काटवटे, औदुंबर हातोळकर, शुभम काशीद, सुखदेव काशीद आदींसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)