घाटीत नोंदणी कक्षासमोर
By | Published: December 2, 2020 04:05 AM2020-12-02T04:05:03+5:302020-12-02T04:05:03+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागातील नोंदणी कक्ष सध्या कोरोनाला आमंत्रण देणारा ठरू पाहत आहे. याठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांच्या लांबच ...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागातील नोंदणी कक्ष सध्या कोरोनाला आमंत्रण देणारा ठरू पाहत आहे. याठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांच्या लांबच लांब रांगा लागत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नाल्याच्या पुलावरील
लोखंडी कठडे गायब
औरंगाबाद : नारळीबाग येथील नाल्यावरील पुलाच्या ऐन कोपऱ्यावरील लोखंडी कठडे गायब झाले आहेत. येथून वाहने वळण घेत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत आहे. याठिकाणी लोखंडी कठडे बसविण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांतून होत आहे.
जय विश्वभारती कॉलनीत
विद्युत डीपीला जाळी बसवा
औरंगाबाद : जय विश्वभारती कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ विद्युत डीपी आहे. या डीपीला संरक्षक जाळीच नाही. खबरदारी म्हणून याठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे. याकडे लक्ष देऊन डीपीला संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
अद्वैत कॉलनीत नाल्याची दुरवस्था
औरंगाबाद : खडकेश्वर येथील अद्वैत कॉलनीत रस्त्यावरील नाल्याची लोखंडी जाळी उघडी पडली आहे. यामुळे अपघात होऊ नये यासाठी येथे मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहेत. याकडे तात्काळ लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
घाटीत रिक्षाचालकांकडून रुग्णांची अडवणूक
औरंगाबाद : घाटीत रिक्षाचालकांकडून रुग्णांची अडवणूक केली जात आहे. सुटी होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांकडून अधिकचे भाडे सांगितले जात आहे. परिणामी, अनेक जण पायीच घाटीबाहेर जाऊन रिक्षात बसतात. रिक्षाचालक मीटरनेही जाण्यास नकार देत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.