आघाडीचे संकेत; आता चर्चा जागा वाटपावर
By Admin | Published: January 17, 2017 12:18 AM2017-01-17T00:18:25+5:302017-01-17T00:29:46+5:30
लातूर : राज्याचे ठरेल तेव्हा ठरेल, मात्र लातूर जिल्ह्यापुरते का होईना आपण एकत्र येऊन आघाडीनेच लढण्याचे ठरवूयात, असे संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज संयुक्त बैठकीत दिले आहेत.
लातूर : राज्याचे ठरेल तेव्हा ठरेल, मात्र लातूर जिल्ह्यापुरते का होईना आपण एकत्र येऊन आघाडीनेच लढण्याचे ठरवूयात, असे संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज संयुक्त बैठकीत दिले आहेत. जागावाटपावर आघाडीचे घोडे अडले असून येत्या दोन दिवसात यावर चर्चा झाल्यानंतरच अंतिम घोषणा होणार आहे. जागावाटपाच्या मुद्यावर एकमत झाल्यास ही आघाडी होणार की फिस्कटणार याकडे डोळे लागले आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सवता सुभा राज्यभर चालू आहे. मात्र भाजपाचा वारु रोखण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र येऊन आघाडीसाठी पुढाकार घेत असल्याचे लातुरातील चित्र आहे. सुरुवातीला जिल्हा बँक आणि आता आ. दिलीपराव देशमुख यांच्या ‘आशियाना’वर दोन्ही पक्षांच्या नेत्यांत दीर्घ बैठक रंगली. या बैठकीला स्वत: आ. देशमुख यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मोईज शेख, रेणाचे चेअरमन आबासाहेब पाटील, मांजराचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, राकाँ जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, संजय बनसोडे, बबन भोसले, प्रशांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मौन राखले. मात्र आघाडी करुनच लढायचे संकेत असून जागावाटपानंतरच अधिकृतपणे जाहीर करण्याचे ठरल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका सूत्राने सांगितले.