मनपात विरोधी पक्षनेता अन् नगरसेवकात फ्रीस्टाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 11:42 PM2016-02-17T23:42:11+5:302016-02-17T23:47:05+5:30
नांदेड :महापालिकेत विरोधी पक्ष नेत्यावरुन शिवसेनेत उघडउघड दोन गट पडले आहेत़
नांदेड :महापालिकेत विरोधी पक्ष नेत्यावरुन शिवसेनेत उघडउघड दोन गट पडले आहेत़ त्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या नगरसेवकाच्या वॉर्डातील दलित वस्तीची कामे बंद करण्यासाठी विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर हे पत्र देत नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक अशोक उमरेकर यांनी त्यांच्याच कक्षात वाद घातला़ हा वाद एवढा विकोपाला गेला, त्याचे पर्यवसान फ्रीस्टाईल हाणामारीत झाले़ त्यानंतर सायंकाळी मात्र दोघांमध्ये समेट झाला़, परंतु या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे़
महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ बोटावर मोजण्याएवढेच आहे़ परंतु त्याच आधारावर विरोधी पक्षनेतेपदाचा मान सेनेला मिळाला़ यापूर्वीचे विरोधी पक्षनेता दीपकसिंह रावत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विरोधी पक्षनेता पदावर सेनेतील अनेक नगरसेवकांनी दावा केला होता़ त्यासाठी जोरदार फिल्डिंगही लावली होती़ परंतु ऐनवेळी विरोधी पक्षनेते पदाची माळ बालाजी कल्याणकर यांच्या गळ्यात पडली़ त्यामुळे कल्याणकरांच्या विरोधात नाराजांची फळी एकत्र झाली होती़ परंतु पक्षशिस्त म्हणून कल्याणकर यांना पाठिंबा देत असताना, त्यांच्या चुकांचा डांगोरा पिटण्याची एकही संधी नाराज नगरसेवकांनी सोडली नाही़ त्यात सेनेचे नगरसेवक अशोक उमरेकर यांचे कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्या वॉर्डात दलित वस्तीअंतर्गत कामे मंजूर करण्यात आली होती, परंतु गाडीवाले यांच्या वॉर्डात दलित वस्तीच नसल्यामुळे ही कामे रद्द करण्यात यावी असे पत्र उमरेकर यांनी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे दिले होते़
त्यानंतर हे काम रद्द करण्यात आले होते़ परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत याच कामांना मंजुरी देण्यात आली़ याबाबत तक्रार करण्यासाठी बुधवारी सायंकाळी चार वाजता उमरेकर यांनी थेट विरोधी पक्ष नेत्यांचे कार्यालय गाठले़ यावेळी त्यांनी कल्याणकर यांना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र का दिले नाही? असा प्रश्न केला़ त्यावर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली़ हा वाद एवढा विकोपाला गेला की, दोघांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी सुरु झाली़
यावेळी कक्षात काही मोजके पत्रकार अन् मनपाचे कर्मचारीही होते़ दोघानींही एकमेकांवर खुर्च्या उचलल्या होत्या़ यावेळी प्रत्यक्षदर्शींनी मध्यस्थी करुन भांडण सोडविले़ त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत कल्याणकर यांच्या कक्षात सेना नगरसेवकांची समझोत्यासाठी बैठक सुरु होती़ रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये समेट झाल्याचे बोलले जात होते़ (प्रतिनिधी)