औरंगाबादेत इंधन भेसळ : अहवाल नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:49 AM2018-01-18T00:49:22+5:302018-01-18T00:49:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, त्याकडे जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, त्याकडे जिल्हा पुरवठा विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. नोव्हेंबर २०१७ पासून या प्रकरणात इंधन भेसळीबाबत तपासणी करण्याचा फार्स पुरवठा विभागाने केला; परंतु त्याचा अहवाल अजूनही आलेला नाही.
क्रांतीचौकातील पेट्रोल पंपावर नोव्हेंबर २०१७ मध्ये पेट्रोलमध्ये पाणी आढळून आल्यामुळे दिवसभर पंपावर नागरिकांनी गदारोळ केला होता. पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीमुळे त्या दिवशीचा तणाव निवळला होता; परंतु तेथील इंधन तपासणीचे नमुने पुरवठा विभागाने घेतल्यानंतर त्याची पुढे काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे भेसळयुक्त इंधन विकणारे पेट्रोल पंपचालक मोकाट असून, त्यांना पुरवठा विभागाकडून आश्रय मिळतोय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा पुरवठा विभागाकडे मंगळवारी एका नागरिकाने पाणीमिश्रित इंधन खिंवसरापार्कमधील साईशरण पेट्रोलपंपातून मिळाल्याची तक्रार पुरवठा अधिकाºयांकडे पुराव्यानिशी केली; परंतु इंधन खरेदीचे बिल नसल्यामुळे त्या नागरिकाची तक्रार घेतली गेली नाही. गेल्या महिन्यात भाजप पदाधिकाºयाच्या चारचाकी वाहनात पाणीमिश्रित डिझेल भरल्याची तक्रार पुढे आली होती.
पुरवठा अधिकारी म्हणाले
पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांना क्रांतीचौकातील पेट्रोल पंपाबाबत चौकशी अहवालाचे काय झाले, याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले की, तेथील इंधन भेसळीच्या नमुन्यांचा चौकशी अहवाल अजून आलेला नाही. दोन महिने उलटले तरी अहवाल का आला नाही. यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
आणखी एक तक्रार
दरम्यान, जालना रोडवरील राज पेट्रोलपंप येथे पाणीमिश्रित पेट्रोल आल्याची तक्रार एका ग्राहकाने बुधवारी केली.
यासंदर्भात या ग्राहकाने सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनदरम्यान राज पेट्रोलपंप येथे दुचाकीत १ लिटर पेट्रोल भरले. मात्र, त्यानंतर घरी जाईपर्यंत गाडी अनेकदा बंद पडत होती. बुधवारी सकाळी गाडी चालू करून थोडे अंतर पुढे गेल्यावर बंद पडत होती. अखेर मेकॅनिककडे गाडी नेली. त्यांनी गाडीच्या टाकीतील सर्व पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत भरले असता. त्यात ७० टक्के पाणी तर ३० टक्के पेट्रोल तरंगत असल्याचे आढळून आले. ती बाटली घेऊन मी राज पेट्रोलपंपवर गेलो तेव्हा तेथील व्यवस्थापक युसूफभाई उडवाउडवीचे उत्तर देऊन निघून गेले. मात्र, मी पुन्हा सायंकाळी पेट्रोलपंपवर तीच बाटली घेऊन गेलो तेव्हा त्यांनी इथेनॉलमुळे पेट्रोलमध्ये पाणी होत असल्याचे कारण सांगितले.
यासंदर्भात युसूफभाई यांना विचारणा केली असता पेट्रोलमध्ये पाणी येत असल्याचे ग्राहकाने सांगितल्यावर आम्ही आमच्या सर्व पंपांवरील पेट्रोलची तपासणी केली. मात्र, तसे आढळून आले नाही.
कंपनीच्या विक्री व्यवस्थापिका अपेक्षा भदोरिया यांनी सांगितले की, केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलला पाण्याचा स्पर्श झाला की इथेनॉल आणि पेट्रोल वेगळे होते. इथेनॉलचे पाणी होते, पेट्रोल टाकीत पाणी झाले की, बाईक सुरूकरण्यास त्रास होतो. यासंदर्भात आज पेट्रोलपंपचालकांची बैठक घेण्यात आली.
जालना रोडवरील राज पेट्रोल पंपावर ग्राहकाने तक्रार करताना दाखविलेली हीच ती बाटली. दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढले असता त्यात पाणीमिश्रित पेट्रोल असल्याचे आढळून आले. पाणी खाली त्यावर पेट्रोल तरंगत होते. तसेच पेट्रोलपंप व्यवस्थापकाने काचेच्या परीक्षण नळीत अगोदर पाणी टाकले व त्यावर पेट्रोल टाकले. हळूहळू पेट्रोलचे रूपांतर पाण्यात होईल, असे हा व्यवस्थापक म्हणाला.
पेट्रोलपंपचालकांची जनजागृती मोहीम
पेट्रोलपंप संघटनेचे अकील अब्बास यांनी सांगितले की, इंधन कंपन्या इथेनॉलमिश्रित पेट्रोल विक्रीसाठी आणत आहेत. पूर्वी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल टाकले जात असे आता १० टक्के इथेनॉल टाकले जाते. पेट्रोलपंपचालक इंधनात पाण्याची भेसळ करीत असल्याच्या तक्रारी चुकीच्या आहेत. यासंदर्भात आम्ही जनजागृती मोहीम हाती घेत आहोत.