सलग ११ व्या दिवशीही इंधन दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:04 AM2018-05-25T00:04:46+5:302018-05-25T00:05:37+5:30
औैरंगाबाद : अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत आता वाहनही तेवढेच अत्यावश्यक बनले आहे. यामुळे पेट्रोल -डिझेलमधील भाववाढीचा फटका थेट सर्वसामान्यांपर्यंत बसत ...
औैरंगाबाद : अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत आता वाहनही तेवढेच अत्यावश्यक बनले आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलमधील भाववाढीचा फटका थेट सर्वसामान्यांपर्यंत बसत आहे. इंधनात १४ मेपासून सुरू झालेली भाववाढ आता उच्चांकावर येऊन पोहोचली आहे. सलग ११ व्या दिवशीही दरवाढीचा ज्वालामुखी उसळलेलाच होता. गुरुवारी पेट्रोल ८६.३१ रुपये, तर डिझेल ७३.९९ रुपये प्रतिलिटरने विकल्या जात होते. मागील ११ दिवसांत पेट्रोल प्रतिलिटरमागे २.६५ रुपये, तर डिझेल २.५४ रुपयांनी वधारले आहे. वाहनही जीवनावश्यक असल्याने भाव वाढले, तरीही नागरिक पेट्रोल खरेदी करीत आहेत. याचा अर्थ असा नाही की त्यांनाही भाववाढ मान्य आहे. प्रत्येक वाहनधारक संताप व्यक्त करीत आहे. केंद्र सरकार या महत्त्वाच्या विषयावर मूग गिळून बसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर पसरला आहे.
महिन्याचा खर्च तीस टक्क्यांनी वाढणार
पेट्रोल आणि डिझेलमध्ये दिवसेंदिवस जी दरवाढ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. दर महिन्याला इंधनाच्या किमतींमध्ये वाढ झालेलीच असते. त्यामुळे दर महिन्याला वेगळे आर्थिक गणित मांडण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे, असे मत व्यावयायिक अमित कुलकर्णी यांनी मांडले.
पती-पत्नी, दोन शालेय शिक्षण घेणारी मुले आणि आई, असा अमित यांचा परिवार असून, त्यांच्याकडे डिझेलवर चालणारी चारचाकी आणि दोन दुचाकी आहेत. अमित आणि शीतल हे दाम्पत्य वेगवेगळा व्यवसाय करतात. महिन्याला सात ते आठ हजार रुपये त्यांचा इंधनावर खर्च होतो.
इंधन भाववाढीवर बोलताना अमित म्हणाले की, यामुळे आता किराणा सामानापासून ते मुलांच्या शाळेच्या रिक्षापर्यंत सगळ्याच गोष्टींवर परिणाम होणार आहे. शाळा सुरू झाल्यावर रिक्षावालेही १५०-२०० रुपयाने निश्चितच वाढ करतील.
इंधनवाढीचा परिणाम जीवनावश्यक गोष्टींवर निश्चितच होतो; पण त्यामुळे आपण जीवनावश्यक गोष्टी घेणे टाळू शकत नाही. त्यामुळे मला दर महिन्याला इंधनावर जो खर्च करावा लागतो त्यामध्ये आता ३० टक्के वाढ होणार असल्याचे दिसून येते. हा अतिरिक्त खर्च मला आणि इतर सर्वसामान्य लोकांना त्यांच्या बचतीमधूनच करावा लागणार आहे. इंधनाच्या दरावर पूर्वी केंद्र सरकारचे नियंत्रण असायचे, आता त्यामध्ये जे विकेंद्रीकरण झाले आहे त्याचा हा दुष्परिणाम आहे.
अमित यांचा जेसीबी आणि पोकलेन मशीन भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर डिझेल लागत असल्यामुळे इंधन भाववाढीचा परिणाम व्यवसायावरही झाला आहे. त्यामुळे व्यवसायातले मार्जिन कव्हर करणे अवघड होत असून, आॅपरेटिंग कॉस्ट वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.