बागडेंना दणका देण्यासाठी फुलंब्रीत शिवसेना-काँग्रेसची ऐनवेळी आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 07:45 PM2019-09-25T19:45:23+5:302019-09-25T19:47:29+5:30
शिवसेनेचे चंद्रकांत जाधव सभापतीपदावर विराजमान
फुलंब्री : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे चंद्रकांत जाधव हे सभापतीपदी निवडून आले. त्यांना १८ पैकी १७ संचालकांची मते मिळाली. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी शेवटच्या क्षणी भाजपवर कुरघोडी करीत शिवसेनेसोबतची जुनी मैत्री जपली.
फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढविली होती. यात काँग्रेसचे ८, शिवसेनेचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, तर भाजपचे ३ संचालक निवडून आले होते. मागील तीन वर्षांपासून काँग्रेसचे संदीप बोरसे सभापती होते. दुसऱ्याला संधी देण्यासाठी त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता.
सभापतीपदासाठी आज २४ सप्टेंबर रोजी निवडणूक झाली. काँग्रेसने शिवसेनेला अडीच वर्षे उपसभापतीपद देण्याचे वचन दिले होते ते पाळले नाही. त्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली. सेनेने भाजपसोबत जाऊन सभापतीपदासाठी जुळवाजुळव सुरूकेली. त्यांना काँग्रेसच्या दोन सदस्यांची साथ मिळाली. त्यामुळे शिवसेना -भाजपकडे ९, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे ९ असे समसमान संचालकांची संख्या झाली.
भाजपची खेळी उधळली
विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या संचालक संगीता संतोष मेटे यांना आज मंगळवारी सकाळी अचानक भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर भाजपने मेटे यांना सभापतीपदासाठी उमेदवारी दिली. हा डाव उधळून लावण्यासाठी डॉ. कल्याण काळे यांनी शिवसेनेचा सभापती करण्यास बिनशर्त पाठिंबा दिला. या नाट्यमय घडामोडीबाबत भाजप अनभिज्ञ राहिली. अगोदर ‘डमी’ उमेदवार म्हणून चंद्रकांत जाधव यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे न घेता तसाच ठेवला. त्यामुळे ऐनवेळी भाजप संचालकांची गोची झाली. दुसरीकडे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झालेल्या संगीता मेटे यांना भाजपच्याच दोन संचालकांनी विरोध केला. उर्वरित सर्व संचालकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला.
या निवडणुकीत काँग्रेसचे सुभाषराव गायकवाड, शिवसेनेचे चंद्रकांत जाधव, तर भाजपकडून संगीता मेटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, दुपारनंतर काँग्रेस उमेदवाराने आपली उमेदवारी माघे घेतली व शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भाजपचे संचालक एकाकी पडले. गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानात शिवसेना उमेदवाराला १७, तर भाजपच्या उमेदवारला स्वत:चे एकच मत मिळाले. सभापतीपद मिळविण्यासाठी भाजपने काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते; पण ऐनवेळी शिवसेनेने उमेदवार उभा केल्याने भाजपची पंचायत झाली.
काँग्रेस- शिवसेना जुनी मैत्री कायम
गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस- शिवसेनेची मैत्री आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेसला मदत केली. काँग्रेसनेही नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे यांना मदत केली होती. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी जुन्या मैत्रीला आज पुन्हा उजाळा दिला.