फुलंब्री तालुक्यात एप्रिलपासून केवळ १५ टक्के ग्राहकांनीच भरले वीज बिल
By | Published: December 2, 2020 04:10 AM2020-12-02T04:10:08+5:302020-12-02T04:10:08+5:30
फुलंब्री : तालुक्यातील २० हजार ग्राहकांकडे महावितरण कंपनीची तब्बल १६ कोटी ७६ लाख रुपयांची बिले थकले आहेत. विशेष म्हणजे ...
फुलंब्री : तालुक्यातील २० हजार ग्राहकांकडे महावितरण कंपनीची तब्बल १६ कोटी ७६ लाख रुपयांची बिले थकले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील केवळ १५ टक्केच ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून वीज बिल भरले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या महावितरण कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
सध्या राज्यभरात महावितरण कंपनी अडचणीत सापडली आहे. यासाठी विविध कारणे सांगितली जात आहेत. मात्र, ग्राहकांकडील थकबाकी तसेच वीज चोरी हे महत्वाचे कारण असल्याचे समोर येत आहे. फुलंब्री तालुक्यात घरगुती, व्यावसायिक, सार्वजनिक पाणी पुरवठा व पथदिवे यासाठी २० हजार ८७८ कनेक्शन देण्यात आलेले आहे. यातील घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहकांचे बिले भरण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असले तरी, गेल्या ८ महिन्यांच्या काळात ८५ टक्के ग्राहकांनी बिल भरणे बंद केले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्राहकांकडे कृषी पंप वगळून आजच्या घडीला १६ कोटी ७६ लाख रुपये थकलेले आहेत.
चौकट
दरमहा बिले १ कोटीची, वसुली ९ लाखांची पण नाही
फुलंब्री तालुक्यात महावितरण कंपनीकडून विविध ग्राहकांना दरमहिन्याला १ कोटी १२ लाखांची बिले दिल्या जातात. पण त्यांची वसुली होत नाही. कोरोना काळात तर ग्राहकांनी बिले भरण्याचा विचार सोडूनच दिलेला असल्याचे दिसून येते. परिणामी महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर याचा दबाव येत असून दरमहिन्याला थकबाकी वाढत आहे.
चौकट
चार हजार कनेक्शन बंद केले
महावितरण कंपनीकडून लॉकडाऊनपूर्वी वीज वसुलीबाबत कडक धोरण स्वीकारले होते. यात तालुक्यातील ४ हजार ३०४ ग्राहकांचा वीज पुरवठा कापण्यात आला होता. त्यांच्याकडे ३ कोटी ४ लाख रुपये थकलेले आहे. त्यांनी आज पावेतो ही थकबाकी भरलेली नाही.
चौकट
तालुक्यात विविध ग्राहकांकडे असलेली थकबाकी
ग्राहक संख्या थकबाकी
घरगुती व व्यावसायिक ९४२० ३ कोटी ३२ लाख
ग्रामपंचायत पथदिवे १०५ ५ कोटी ७१ लाख
सार्वजनिक पाणीपुरवठा ११५ ३ कोटी ३८ लाख
औद्योगिक कनेक्शन ६४ १७ लाख