फुलंब्री तालुका : ‘ऑन दी स्पॉट रिपोर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:05 AM2021-05-10T04:05:17+5:302021-05-10T04:05:17+5:30
ऑन दी स्पॉट रिपोर्ट : फुलंब्री तालुक्यातील चित्र, गावात आरोग्य केंद्र असल्याने वेळेतच उपचार मिळाले, मृत्यूचे तांडव रोखण्यात यश ...
ऑन दी स्पॉट रिपोर्ट : फुलंब्री तालुक्यातील चित्र, गावात आरोग्य केंद्र असल्याने वेळेतच उपचार मिळाले, मृत्यूचे तांडव रोखण्यात यश
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलंब्री : तालुक्यातील गणोरी गावात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक निघाली आहे तर गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाल्याने मृत्यूचे तांडव रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मात्र, या गावातील ग्रामस्थांना मास्क व सोशल डिस्टन्सचे वावडे असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी पावले उचलली जात असली, तरी ग्रामस्थांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
फुलंब्री शहरानंतर तालुक्यात गणोरी हे गाव सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या सहा हजारपेक्षा जास्त आहे. येथील बहुतांश शेतकरी हे बागायती आहेत. त्यामुळे गाव आर्थिकदृष्टया सधन मानले जाते. कोरोनाचे सावट सुरू झाल्यानंतर पहिल्या लाटेत ९२ तर दुसऱ्या लाटेत २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरूवातीपासून ग्रामपंचायत असो अथवा आरोग्य विभाग यांच्याकडून गावात कोरोनासंदर्भात जनजागृती केली जात आहे. विविध उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सोशल डिस्टन्सचा उडाला फज्जा
गणोरी गावातील आजची परिस्थिती जाणून घेण्यासाठी रविवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने गावात फेरफटका मारला. तेव्हा गावातील कोरोना वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बाबी समोर आल्या. सकाळी दहाच्या सुमारास गावातील मुख्य वेशीबाहेरील अत्यावश्यक सेवेतील दुकांनासह अन्य दुकानेही सुरू असल्याचे दिसून आले. बहुतांश ग्रामस्थांनी मास्क घातलेला नव्हता. सोशल डिस्टन्सचे तर विचारूच नका. सहा फुटाचे अंतर ठेवून एकमेकांशी बोलणे अपेक्षित असताना गावात अनेक ठिकाणी विनामास्क गर्दीने उभे असलेले लोक दिसून आले. घोळका करून गप्पा मारणारे लोक अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.
ग्रामदक्षता समितीकडून जनजागृती
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध लागू केल्यापासून नियमांचे पालन केले जात आहे. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आवश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतात. त्यानंतर गावात सर्व बंद असते. गावातील परिस्थितीबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. ग्रामदक्षता समितीतर्फे जनजागृती तसेच आवश्यक असलेली दक्षता घेतली जात असल्याचे दिसून येते.
शेतवस्त्यांवर उरकले कार्यक्रम
गावात गेल्या वर्षभरात अनेक कार्यक्रम पार पडले. पण ते कार्यक्रम गावात न घेता, छोटेखानी स्वरूपात शेतवस्त्यांवर घेण्यात आले. यात विवाह, अंत्यविधी, उतरकार्य आदींचा समावेश आहे. लोकांची गर्दी होऊ नये, म्हणून ग्रामपंचायतीकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले.
आरोग्य केंद्रामुळे तत्काळ उपचार
प्राथमिक आरोग्य केंद्र हे गावातच असल्याने येथे कोरोना संशयित रुग्ण आढळून आले असले, तरी त्यांची तपासणी सुविधा व उपचारांची सुविधा त्वरित उपलब्ध झाली. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची त्वरित तपासणी केली गेली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिल्याने संसर्गाचा धोका कमी होत गेला. त्यामुळेच गावात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. केवळ वेळेवर उपचार मिळाल्यानेच हे शक्य झाले.
गणोरी कोरोना अपडेट
गणोरी गावाची लोकसंख्या : ६,२००
कोरोनाबाधित रुग्णाची संख्या : ११७
एकूण मृत्यू संख्या : ००