युवकांच्या प्रयत्नातून फुलली समता नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 12:05 AM2017-03-31T00:05:19+5:302017-03-31T00:07:50+5:30
उस्मानाबाद : युवक एकत्र आले की चांगली कामे यशस्वी होतात याची प्रचिती समता मध्यवर्ती गणेश मंडळाच्या युवकांनी केलेल्या कामातून दिसून येत आहे़
उस्मानाबाद : युवक एकत्र आले की चांगली कामे यशस्वी होतात याची प्रचिती समता मध्यवर्ती गणेश मंडळाच्या युवकांनी केलेल्या कामातून दिसून येत आहे़ विविध समाजाभिमुख उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाच्या युवकांनी समता नगर मधील मुख्य मार्गावर ५५ झाडे लावली असून, त्याचे सुशोभिकरण केले आहे़ त्यामुळे सह्याद्री कॉर्नर ते आनंदनगर कॉर्नरचा रस्ताच फुलला असून, भर उन्हाळ्यातील हिरवी झाडे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना एक वेगळाच आनंद देत आहेत़ तर ‘माणुसकीची भिंत’ या माध्यमातून या युवकांनी जवळपास १५० गरजुंना कपडे उपलब्ध करून दिले आहेत़
उस्मानाबाद शहरातील समता नगर भागातील युवकांनी विविध समाजाभिमुख उपक्रम राबवून आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे़ यात समता मध्यवर्ती गणेश मंडळातील युवकांचे काम आग्रभागी दिसून येते़ प्रत्येक गणेशोत्सव काळात विविध देखाव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन या युवकांनी केले आहे़ गतवर्षी दुष्काळी परिस्थितीत गणेशोत्सव साजरा करताना या युवकांनी समता नगर मधील मुख्य मार्गावर वृक्षारोपन करून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला होता़ या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी मंडळाचे अॅड़ अमर लाहोरे, संदीप साळुंके, वैभव मोरे, सुजित साळुंके, निखिल शेरखाने, समर्थ हाजगुडे, विनय जोशी, अमित साळुंके, उमेश शिंदे, सुरेश डोके यांच्यासह इतर युवकांनी पुढाकार घेऊन ‘हायकस’ प्रजातीची जवळपास ५५ रोपे आणली़ सह्याद्री कॉर्नर ते आनंदनगरच्या कॉर्नरपर्यंत मुख्य मार्गावर वृक्षारोपन करण्यात आले़ वृक्षारोपनानंतर त्याकडे दुर्लक्ष न करताना आठवड्यातून एक ते दोन वेळेस रात्रीच्या सुमारास या युवकांनी स्वत: पुढाकार घेत झाडांना पाणी देण्याचे काम सुरू ठेवले आहे़ परिणामी भर उन्हाळ्यातही ही सर्वच्या सर्व झाडे हिरवीगार दिसत असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत़ गणेशोत्सव काळात लावलेल्या झाडांचे शिवजयंतीनिमित्त युवकांनी सुशोभिकरण केले़ जवळपास ४० हजार रूपये खर्च करून झाडांचे सुशोभिकरण केल्याने निसर्गरम्य वातावरण तयार झाले आहे़ या मंडळातील युवकांनीच्याच पुढाकाराने समता नगर मध्ये ‘माणुसकीची भिंत’ उभा करण्यात आली आहे़ १९ फेब्रुवारी रोजी ही ‘माणुसकीची भिंत’ उभा करण्यात आली असून, आजवर जवळपास १५० गरजूंना कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ एकूणच पालिकेच्या ‘स्वच्छ शहर, सुंंदर शहर’ उपक्रमाच्याही पुढे जाऊन या युवकांनी खऱ्या अर्थाने ‘सुंदर समतानगर’ तयार करण्याचा संकल्प केला असून, त्याच दिशेने युवकांची वाटचाल सुरू आहे़(प्रतिनिधी)