‘वीकेंड लॉकडाऊन’ला औरंगाबाद सामसूम, नागपूरमध्ये मात्र वर्दळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 07:23 AM2021-03-14T07:23:23+5:302021-03-14T07:23:23+5:30

नागपूर शहरात बाजारपेठा बंद होत्या. परंतु रस्त्यांवरची वर्दळ मात्र कुठेही कमी झालेली दिसून आली नाही. रस्त्यांवर लोक बिनधास्त फिरत होते.  टपरी व रस्त्याच्या काठाने उभे राहून नाश्ता करीत होते.

The full weekend lockdown in Aurangabad but Crowd in Nagpur | ‘वीकेंड लॉकडाऊन’ला औरंगाबाद सामसूम, नागपूरमध्ये मात्र वर्दळ

‘वीकेंड लॉकडाऊन’ला औरंगाबाद सामसूम, नागपूरमध्ये मात्र वर्दळ

googlenewsNext

औरंगाबाद/नागपूर : कोरोना रुग्णाचा दररोज वाढणारा धक्कादायक  आकडा पाहून धास्तावलेल्या औरंगाबादकरांनी शनिवारी पहिला ‘वीकेंड लॉकडाऊन’ कडकडीत पाळला. वर्षभरापूर्वीची कटू स्मृतिचित्रे पुन्हा जशीच्या तशी पुढे येत शहराचे जनजीवन भरदिवसा ठप्प  झाले. उद्योग सुरू असले तरी कामगार संख्या घटली होती. बाजारपेठा बंद होत्या व रस्तेही ओस पडले होते. (The full weekend lockdown in Aurangabad but Crowd in Nagpur)

नागपूर शहरात बाजारपेठा बंद होत्या. परंतु रस्त्यांवरची वर्दळ मात्र कुठेही कमी झालेली दिसून आली नाही. रस्त्यांवर लोक बिनधास्त फिरत होते. 
टपरी व रस्त्याच्या काठाने उभे राहून नाश्ता करीत होते. नागपुरातील ही गर्दी पाहून खरच कोरोनाची कुणाला भीती आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. उद्या रविवारी सुद्धा बंद राहणार असून सोमवारपासून २१ तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू होईल. यासाठी प्रशासनासह पोलीस विभागानेही कंबर कसली आहे.बाजारपेठा बंद होत्या. 

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ये-जा करताना दिसून येत होते. दुपारी १२ ते ३ या वेळेत रस्ते अक्षरशः निर्मनुष्य झाले होते. दुपारी ४ वाजेनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुचाकी आणि पादचाऱ्यांची संख्या काहीशी वाढली. मात्र, दिवसभर नागरिक घरातच थांबून होते. 

- औरंगाबादला रेल्वे आणि एसटी प्रवाशांची संख्या रोडावली होती.
- बसस्थानक, रेल्वेस्थानकावर प्रवाशांची तुरळक 
गर्दी होती. 
- एसटी फेऱ्या रद्द केल्याने बसची तासन‌्तास वाट पाहत प्रवासी ताटकळले हाेते. 


नागपूर : पॉझिटिव्ह रुग्णाचा रुग्णालयातून पळ 
मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या २७ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शनिवारी सकाळी ७ वाजता पळून गेल्याने खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेऊन हिंगणघाट येथील घरी त्याला पकडण्यात आले. मेडिकल ते हिंगणघाट त्याने कशाने प्रवास केला, त्याच्या संपर्कात कोण आले, याचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला जाणार आहे.


नांदेडमध्ये ५९१  नवे रुग्ण -
- नांदेडमध्ये शनिवारी नव्या कोरोना रुग्णांनी उच्चांक गाठला असून, तब्बल ५९१ नवे रुग्ण आढळले आहेत. 
- चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऐन कोरोना काळातही इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी इतके रुग्ण आढळले नव्हते. 
- यामध्ये नांदेड मनपा हद्दीतील ४७३ रुग्णांचा समावेश आहे.
- शनिवारी दोन पुरुष आणि दोन महिला रुग्णांच्या मृत्यूसह एकूण कोरोना बळींची संख्या ६१४ इतकी झाली आहे.

नाशिक : बंद नको असेल तर मास्क वापरा -
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नाशिक शहरात शनिवारी आणि आज, रविवारी दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. व्यावसायिकांनी उत्स्फूर्त बंद पाळल्याने शहरात रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. काही ठिकाणी मास्कविक्री चालू होती. बंदमध्येही मास्क खरेदीसाठी लोक येत होते. त्यानिमित्ताने मास्कचे महत्त्व अधोरेखित झालेले पाहायला मिळाले.

Web Title: The full weekend lockdown in Aurangabad but Crowd in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.