चिंतेत भर; शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ६.२९ ,अनेक नागरिक मास्कविना सैराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 07:14 PM2022-01-08T19:14:55+5:302022-01-08T19:15:08+5:30
Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या जास्त असली, तरी रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.
औरंगाबाद : शहराचा पॉझिटिव्हिटी रेट (Corona Virus ) झपाट्याने वाढत चालला आहे. शुक्रवारी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ६.२९पर्यंत पोहोचला. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता अधिक वाढली. एकीकडे शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना काही सर्वसामान्य नागरिक मास्कविना सैराट झाले आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या जास्त असली, तरी रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. अवघ्या ७ दिवसात रुग्ण बरे होत आहेत. दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती. सध्या बाधित रुग्णांना फारसा त्रास होत नाही. शहरात समूह संसर्गाची स्थिती येऊ नये, यादृष्टीने महापालिकेकडून व्यापक उपाययोजनासुद्धा करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहनही वारंवार करण्यात आले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत शहरात कोरोना रुग्णांची संख्या जेमतेम होती. ३१ डिसेंबरपासून हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे. दररोज किमान अडीच हजार नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामध्ये शंभरपेक्षा अधिक बाधित आढळत आहेत. शुक्रवारी तर बाधितांचा आकडा १५१पर्यंत पोहोचला.
असा वाढत गेला पॉझिटिव्हिटी रेट
३१ डिसेंबर - ०.९१
०१ जानेवारी - ०.७३
०२ जानेवारी - १.३४
०३ जानेवारी - १.२१
०४ जानेवारी - ३.७८
०५ जानेवारी - ४.२३
०६ जानेवारी - ५.२८
०७ जानेवारी - ६.२९