शिर्डी संस्थानचा घाटी रुग्णालयासाठीचा निधी प्रशासकीय मान्यतेत अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:47 PM2018-06-27T17:47:55+5:302018-06-27T17:48:48+5:30
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रस्तावास अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.
औरंगाबाद : शिर्डी संस्थानकडून राज्याच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांना ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळून निधी हस्तांतरित झाला आहे; पण औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रस्तावास अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत नसल्याने प्रशासकीय मान्यता रखडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिर्डी संस्थानच्या १५ कोटी रुपयांच्या निधीचे हस्तांतरण रखडले आहे.
शिर्डी संस्थानतर्फे देणगीरूपातून जमा झालेला निधी राज्याच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना दिला जातो. काही दिवसांपूर्वी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना ७१ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार नागपूरसाठी ३५.३, यवतमाळ १३, चंद्रपूर ७.५ आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी १५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली. यापूर्वी त्यांनी निधी कशासाठी खर्च करावयाचा आहे, याचे प्रस्ताव संबंधित रुग्णालयांकडून मागवले होते.
चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ येथील प्रस्तावास राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून हा निधी हस्तांतरित करवून घेतला आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच १५ कोटी रुपयांचा निधी शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून मंजूर झाला आहे. या निधीतून रुग्णालयासाठी मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजनिंग (एमआरआय) मशीन खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.
या प्रस्तावास तांत्रिक मान्यता मिळाली असली तरी प्रशासकीय मान्यता अद्याप मिळालेली नाही. ही मान्यता मिळविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या निधीचे हस्तांतरण रखडले आहे. क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. अनघा रोटे यांनी यासंदर्भात तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा केला; पण शासनस्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत नसल्याने सध्या तरी हा निधी हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
आठ दिवसांपूर्वी पत्र दिले
आठ दिवसांपूर्वी पत्र दिलेशिर्डी संस्थानचा निधी जाहीर होण्यापूर्वी तो थेट मिळण्याची शक्यता होती, त्यामुळे प्रशासकीय मान्यतेसाठी पत्र पाठविण्यात आले नव्हते. आठ दिवसांपूर्वी प्रशासकीय मान्यतेसाठी पत्र पाठविण्यात आले आहे. आगामी आठ ते पंधरा दिवसांत एमआरआय मशीन घाटीत दाखल होईल.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद