औरंगाबाद मनपाच्या तिजोरीवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 02:06 PM2018-10-27T14:06:10+5:302018-10-27T14:08:11+5:30
ज्येष्ठता यादी डावलून मुख्य लेखाधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये वाटून टाकल्याने शुक्रवारी संतप्त नगरसेवकांनी लेखा विभागात ठिय्या आंदोलन केले.
औरंगाबाद : महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे. १७० कोटींची बिले मागील ७ महिन्यांपासून थकीत आहेत. कंत्राटदार बिलांचे पैसे मिळविण्यासाठी सैरावैरा धावपळ करीत आहेत. मनपा आयुक्तांच्या अनुपस्थितीत मुख्य लेखाधिकारी सु. ग. केंद्रे यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपयांची बिले वाटप केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्येष्ठता यादी डावलून मुख्य लेखाधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये वाटून टाकल्याने शुक्रवारी संतप्त नगरसेवकांनी लेखा विभागात ठिय्या आंदोलन केले.
मागील काही दिवसांपासून लेखा विभागात पाच कोटींहून अधिक रक्कम होती. बुधवारी आणि गुरुवारी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपयांची बिले अदा केली. शुक्रवारी काही नगरसेवकांनी लेखा विभागाकडे चौकशी केली असता तिजोरीत पैसेच नसल्याचे कळाले. त्यामुळे संतप्त नगरसेवकांचा पार अधिक चढला. त्यांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. यामध्ये एका पदाधिकाऱ्याचा समावेश होता. या आंदोलक पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून काही बिले काढण्यात आलेली आहेत हे विशेष.
महापौरांना धमकी
शुक्रवारी दुपारी ४ वाजता महापौर नंदकुमार घोडेले आपल्या दालनात बसून दैनंदिन कामकाज करीत असताना त्यांच्या मोबाईलवर वक्ते नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने ‘महापालिकेत पैसे नसताना कामे कशाला दिली, कंत्राटदार आत्महत्या करीत आहेत. याला जबाबदार तुम्ही आहात,’ अशा शब्दांत धमकी दिली. महापौरांनीही त्याचा आपल्या पद्धतीने समाचार घेतला. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचे आदेश त्यांनी दिले.