महापालिकेत निधी पडून; कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:06 AM2017-09-11T01:06:38+5:302017-09-11T01:06:38+5:30
मागील काही वर्षांमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून शेकडो कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला. हा निधी वर्षानुवर्षे बँकांमध्ये पडून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील काही वर्षांमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून शेकडो कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला. हा निधी वर्षानुवर्षे बँकांमध्ये पडून आहे. ज्या विकास कामांसाठी शासनाने निधी दिला आहे, ती कामे सुरूच झालेली नाहीत. जी कामे सुरू झाली आहेत, ती अर्धवट अवस्थेत आहेत. प्रशासकीय इच्छाशक्ती नसल्याने हा निधी पडून असल्याचे समोर आले आहे.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत आतापर्यंत महापालिकेला २८१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाने स्मार्ट सिटीसाठी दरवर्षी तब्बल शंभर कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. मागील वर्षी मनपाला १३७ कोटी रुपये देण्यात आले. हा निधी महापालिकेने एका खाजगी बँकेत ठेवला. संपूर्ण निधी राष्टÑीयीकृत बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवला असता तर कोट्यवधी रुपयांचे व्याज महापालिकेला मिळाले असते. जायकवाडीहून औरंगाबादपर्यंत पाणी आणण्यासाठी ७ वर्षांपूर्वी केंद्र व राज्य शासनाने १५० कोटींचा निधी दिला आहे. हा निधीही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवला आहे. त्यावर १०० कोटी रुपये व्याज जमा झाला आहे. पाच अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी महापालिकेला तीन वर्षांपूर्वी १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी दिला. या निधीत मनपाने ३ कोटी रुपये टाकावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. महापालिका निधी तिजोरीत ठेवून गप्प आहे.