१०० टक्के लसीकरण झालेल्या पहिल्या २५ गावांना देणार निधी : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 07:14 PM2021-11-17T19:14:30+5:302021-11-17T19:15:48+5:30
जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले असून लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी ते गावागावांत जाऊन लोकांना प्रोत्साहित करीत आहेत.
औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊ नये यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण वाढावे यासाठी जिल्ह्यातील ज्या गावाने शंभर टक्के लसीकरण केले आहे, अशा पहिल्या २५ गावांना विकास कामांमध्ये अतिरिक्त निधी देण्याचा शब्द जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिला.
जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले असून लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी ते गावागावांत जाऊन लोकांना प्रोत्साहित करीत आहेत. गल्ले बोरगाव, वेरूळ, तलाववाडी, शुलीभंजन, कागजीपुरा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडल्या. सोमवारी रात्री कागजीपुरा येथील फैज-ए-आम ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्यास भेट दिली. त्यानंतर वेरूळ येथील दर्गा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर शुलीभंजन, वेरूळ, कसाबखेडा या गावांना भेट देत जिल्हाधिकाऱ्यांनी गल्ले बोरगाव येथे मुक्काम केला.
मंगळवारी सकाळी गल्ले बोरगाव येथे चव्हाण व पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी लसीकरण बूथला भेट देऊन ग्रामसभा घेतली. असंघटीत कामगार नोंदणी व उर्वरित नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तेथे बाहेरून आलेल्या ७०० ऊसतोड कामगारांचेही लसीकरण करून घेण्याचे निर्देश दिले.
शिवार फेरी मारून प्रकल्पांना भेटी
जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी मारली. तसेच गल्ले बोरगाव येथून ६ किलोमीटर पायी चालत जात शिवणी टाकळी मध्यम प्रकल्पाला भेट दिली. प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रामीण भागातील मुक्काम चर्चेचा विषय होता. सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, पोलीस पाटील सिंधू बढे, तुकाराम हरदे, संजय भागवत, संतोष राजपूत, दिलीप बेडवाल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.