पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर सीमावर अंत्यसंस्कार

By Admin | Published: July 17, 2017 12:49 AM2017-07-17T00:49:42+5:302017-07-17T00:59:09+5:30

सोयगाव/बनोटी : सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील शाळकरी मुलीच्या हत्येचा तपास लागला नाही म्हणून संतप्त गावकऱ्यांनी अंत्यविधी रोखून धरला होता.

Funeral on the border after the meeting of the Superintendent of Police | पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर सीमावर अंत्यसंस्कार

पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर सीमावर अंत्यसंस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सोयगाव/बनोटी : सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील शाळकरी मुलीच्या हत्येचा तपास लागला नाही म्हणून संतप्त गावकऱ्यांनी अंत्यविधी रोखून धरला होता. शेवटी रविवारी रात्री पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी हनुमंतखेडा येथे भेट दिल्यानंतर मयत सीमा राठोडवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, गळा आवळून सीमाचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पाणी आणण्यासाठी गेलेल्या सीमा राठोड या १६ वर्षीय मुलीचा मृतदेह शनिवारी घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावरील दरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. कालपासून पोलीस आरोपींच्या शोधासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. रविवारी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी बनोटी दूरक्षेत्रात येऊन चौकशी केली. मात्र त्या हनुमंतखेडा येथे न गेल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. पोलीस अधीक्षक जोपर्यंत गावात येत नाही, तोपर्यंत अंत्यसंसकार करणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यामुळे पोलीस अधीक्षकांनी रात्री हनुमंतखेडा येथे जाऊन गावकऱ्यांशी व सीमाच्या कुंटुबियांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली.
गावात एकही चूल पेटली नाही
हनुमंतखेडा गावात रविवारी एकाही घरात चूल पेटली नाही. गावात ग्रामसभा घेऊन सीमा राठोडच्या हत्येचा निषेध करण्यात आला. ग्रामसभेत सीमाच्या हत्येची सीआयडीमार्फ त चौकशी करण्यात यावी, दोषींवर तात्काळ कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. गावातील तरूणांनी शांत राहावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राजू राठोड यांनी केले.
सीमाचा मृतदेह रविवारी सायंकाळी पाच वाजता हनुमंतखेडा येथे आल्यावर गाव शोकमग्न झाले होते. नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. लेखी आश्वासन दिल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार असा पवित्रा घेतला. आरोपींना तात्काळ अटक करू, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिल्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. तहसीलदार तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट न दिल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. सीमाला न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या, सोमवारी सोयगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Funeral on the border after the meeting of the Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.