वरठाण येथे काढली मृत वानराची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:04 AM2021-02-23T04:04:17+5:302021-02-23T04:04:17+5:30
सोयगाव : तालुक्यातील वरठाण येथे विजेच्या तारांचा स्पर्श होऊन जोरदार धक्का बसल्याने एका वानराचा रविवारी मृत्यू झाला. गावकऱ्यांनी या ...
सोयगाव : तालुक्यातील वरठाण येथे विजेच्या तारांचा स्पर्श होऊन जोरदार धक्का बसल्याने एका वानराचा रविवारी मृत्यू झाला. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करीत, मृत वानराची अंत्ययात्रा काढून त्याच्यावर विधिप्रमाणे अंत्यसंस्कार केले.
वरठाण गावात गेल्या काही दिवसांपासून जवळपास ५० वानरांची टोळी सक्रिय आहे. ग्रामस्थांनी काही खायला दिले, तर ही वानरे अलगद घेतात, तसेच आतापर्यंत त्यांनी गावातील कोणालाही इजा केली नाही. रविवारी ५ वाजण्याच्या सुमारास ही टोळी जिल्हा परिषद शाळेकडे आली होती. इकडून तिकडे उड्या मारीत असताना, यातील एका वानराला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जोराचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने टोळीतील सर्व जण एकत्र येऊन मृत वानराजवळ बसले होते. हे दृश्य पाहून ग्रामस्थही गहिवरले. यानंतर तरुणांनी पुढाकार घेत अंत्ययात्रा काढून, त्या वानरावर विधिप्रमाणे अंत्यसंस्कार केले. या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. त्यामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी सरपंच अनिल सोळंके, पोलीस पाटील नरेंद्र सोळंके, नितीन सोळंके, नामदेव सूर्यवंशी, बालू खंडाळे, मनोज जाधव, विकास महाले, किशोर सोळंके, अरविंद जाधव, कल्याणसिंग सोळंके, बाळासाहेब सोळंके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
छायाचित्रओळ : विजेच्या धक्क्याने मृत झालेल्या वानराची ग्रामस्थांनी अंत्ययात्रा काढली.
210221\ynsakal75-070248248_1.jpg
वानराची अंत्ययात्रा काढण्यात आली.