फुर्रर फुर्रर! खेळतानाची चुक नडली, १४ वर्षीय मुलगा बोलला की वाजायची शिट्टीच
By संतोष हिरेमठ | Published: August 9, 2023 01:29 PM2023-08-09T13:29:09+5:302023-08-09T13:30:11+5:30
मोफत झाले उपचार; शासकीय रुग्णालय घाटीतील डाॅक्टरांनी केली वेदनेतून सुटका
छत्रपती संभाजीनगर : एका १४ वर्षीय मुलाने चक्क खेळण्यातील शिट्टी गिळली. शिट्टी गिळल्यानंतर श्वास घेतल्यानंतर आणि बोलताना शिट्टीचा आवाज होत होता. अशा अवस्थेत या मुलाला घेऊन कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचाराचा खर्च ऐकून त्यांचे डोळे पांढरे झाले. अखेर या मुलाला घेऊन कुटुंबीय घाटीत दाखल झाले आणि येथील कान-नाक-घसा विभागातील डाॅक्टरांची अडकलेली शिट्टी काढून मुलाची सुटका केली.
घाटी रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागात हा मुलगा दाखल झाला. तेव्हा त्याची स्थिती पाहून डाॅक्टरदेखील क्षणभर अवाक झाले. खेळण्यातील शिट्टी श्वासनलिकेत खूप आतपर्यंत गेली होती. त्यामुळे मुलाला श्वास घेणेही अवघड होत होते. त्यामुळे त्याला तत्काळ ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला तर शिट्टीचा आवाज येत होता. जवळपास अर्धा तासात एंडोस्कोपीद्वारे त्याच्या श्वासनलिकेत अडकलेली शिट्टी काढण्यात डाॅक्टरांना यश आले. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कान-नाक-घसा विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख, डाॅ. प्रशांत केचे आणि डाॅ. शैलेश निकम यांनी ही शिट्टी काढली. यासाठी वरिष्ठ निवासी डाॅ. शरद शेळके यांच्यासह कान-नाक-घसा विभागातील डाॅक्टर्स, कर्मचारी तसेच भूलतज्ज्ञांनी सहकार्य केले.
खासगीत अशा प्रकरणात किती खर्च?
खासगी रुग्णालयात अशा प्रकारच्या प्रकरणात किमान ३० हजार ते ४० हजार रुपयांचा खर्च येतो. घाटी रुग्णालयात मात्र अगदी मोफत उपचार झाला. डाॅ. शैलेश निकम म्हणाले, एका अडीच वर्षीय मुलीने गिळलेली पीन काढण्याचीही शस्त्रक्रिया यशस्वी केली. लहान मुले कोणत्याही वस्तू गिळण्याची भीती असते. पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे.