पोलिसांची आगळीवेगळी कारवाई; अपघाताच्या गुन्ह्यात फिर्यादी अन् आरोपी एकच कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 12:19 PM2023-08-09T12:19:37+5:302023-08-09T12:20:27+5:30
प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार अपघातात एक उच्चपदस्थ अधिकारी होता.
छत्रपती संभाजीनगर : सोमवारी सायंकाळी बीबी-का-मकबऱ्यासमोर चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला. यात जखमींनी अचानक तक्रारीस नकार दिला. त्यानंतर, एका हाॅटेल चालकाने ठाण्यात हजर होऊन अपघात केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना, तक्रारदाराच्या तक्रारीवरून तक्रारदारालाच आरोपी करत, एक आगळा वेगळा गुन्हा बेगमपुरा पोलिसांनी दाखल केला.
सोमवारी दुपारी मकबरा परिसरात एम एच १५ - एच एम - ९९५२ या कार चालकाने दोघांना उडविले. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार यात एक उच्चपदस्थ अधिकारी होता. हनुमान टेकडी परिसरात एका सोसायटीत कार सोडून तो पसार झाला. जखमी रात्री ठाण्यातही गेले. मात्र, अचानक काही कॉल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. याच दरम्यान पडेगावमधील रायबा हॉटेलचे चालक समीर श्रीकृष्ण अंबारखाने हे ठाण्यात दाखल झाले. हा अपघात माझ्याकडून झाल्याची कबुली देत, अपघातानंतर मी घाबरल्याने निघून गेलो, असा जबाब दिला. त्यानुसार, पोलिसांनी अंबारखाने यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या संदर्भात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला विचारणा केली असता, हा गुन्हाच योग्य प्रकारे दाखल केला नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. एखाद्या घटनेत आरोपी स्वत: ठाण्यात हजर होत असेल, तर उपस्थित पोलिस अंमलदार, डीओने त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे स्वत: फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करणे अपेक्षित असते, शिवाय डायरी नोंदमध्ये तसे नमूद केले, तरी न्यायालयात तेही एफआयआरच्याच समान मान्य केले जाते. त्यामुळे एफआयआरमध्ये फिर्यादी व आरोपी एक होऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.
कबुलीजबाब सिद्ध होणार नाही
तपासात सिद्ध झाल्यानंतर तक्रारदाराला आरोपी करता येते. मात्र, त्यासाठी तपास, चौकशी आवश्यक असते. एफआयआर दाखल करतानाच, तक्रारदारालाच आरोपी करणे योग्य नाही. कायद्याच्या दृष्टीने ते टिकणारही नाही. भारतीय पुरावा कायदा कलम २५ नुसार पोलिस अधिकाऱ्याला दिलेला कबुलीजबाब कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीविरुद्ध सिद्ध करता येणार नाही.
- ॲड.प्रशांत नागरगोजे, कायदे अभ्यासक.