‘भावी सहकारी’ म्हणाले ठाकरे, संभाव्य युतीचे वाजले नगारे; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 05:23 AM2021-09-18T05:23:45+5:302021-09-18T05:24:37+5:30

मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख ‘भावी सहकारी’ असा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

future colleagues said cm uddhav Thackeray the bell rang of a possible alliance pdc | ‘भावी सहकारी’ म्हणाले ठाकरे, संभाव्य युतीचे वाजले नगारे; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

‘भावी सहकारी’ म्हणाले ठाकरे, संभाव्य युतीचे वाजले नगारे; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख ‘भावी सहकारी’ असा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेलाही उधाण आले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जि.प.च्या नूतन वास्तूचे भूमिपूजन  व पैठण येथील संतपीठाचे लोकार्पण झाले. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच रेल्वे राज्यमंत्री दानवे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले, ‘मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन समृद्धी महामार्गासोबत होऊ शकते. त्यासाठी ३८ टक्के जागेचे भूसंपादन गरजेचे आहे. मात्र, मी राज्यमंत्री असल्याने मला काही मर्यादा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा’.
 दानवे यांच्या या वक्तव्याचा धागा पकडून मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच, ‘व्यासपीठावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्र आल्यास भावी सहकारी’ अशी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

- ऑरिक सिटीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीतील भाजपचा भविष्यातील सोबती कोण, यावर मुख्यमंत्री ठाकरे थेट बोलले नाहीत. 

- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना मुंबईला ‘भावी सहकारी’ होण्यासाठी नव्हे तर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी बोलाविल्याचे सांगून ते म्हणाले, राजकारण एका पातळीवर असावे, त्याचे विकृतीकरण नसावे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, महाविकास आघाडीतील एका पक्षासोबत ते जाणार असल्याचे माझ्या कानावर आले आहे. 

राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकते. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहोत. हे जे काही अनैसर्गिक गठबंधन तयार झालंय, ते फार काळ चालू शकत नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांच्याही हे लक्षात आले असेल. त्यामुळे त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली असेल. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये, हे मी कसे ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कसं सांगू शकतो? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचं, राज्य कसं चालवायचं, समस्या काय आहेत यावर चर्चा होतात. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांची आधीपासूनच थट्टामस्करी करण्याची सवय आहे. सध्या भाजप खूप तणावग्रस्त आहेत. त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला असेल.  पण महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षे चालणार असा विश्वास आहे. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: future colleagues said cm uddhav Thackeray the bell rang of a possible alliance pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.