७२ तासांच्या जाचक अटीमुळे सोयगावात पीक विम्याचे भवितव्य अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:05 AM2021-03-08T04:05:17+5:302021-03-08T04:05:17+5:30
सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामात तालुक्याचे प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी पिकासह मका, ज्वारी, सोयाबीन, तूर, बाजरी आदी खरिपाच्या ...
सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामात तालुक्याचे प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी पिकासह मका, ज्वारी, सोयाबीन, तूर, बाजरी आदी खरिपाच्या पिकांचे अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले आहे; परंतु संबंधित कंपन्यांनी नुकसान झाल्याच्या कालावधीपासून ७२ तासांच्या आत नुकसानीची तीव्रता संबंधित टोल फ्री क्रमांकावर कळविण्याबाबतची अट अनिवार्य केली होती. मात्र, पीक विम्याची रक्कम भरूनही नुकसानीची इत्यंभूत माहिती अनेक बाधित शेतकऱ्यांना कंपनीला देता आलेली नव्हती. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तालुक्याची खरिपाची अंतिम आणेवारी ४७ टक्के इतकी घोषित झालेली आहे. त्यामुळे ५० टक्क्यांच्या आत महसूल प्रशासनाने खरिपाची आणेवारी असल्याची माहिती संबंधित कंपन्या आणि जिल्हा प्रशासनाला कळविलेली आहे. मात्र, कंपन्या टोल फ्री क्रमांकाच्या कॉलवर ठाम आहेत. अनेक शेतकऱ्यांना माहिती नसल्याने ७२ तासांची ही जाचक अट त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. यावर तातडीने तोडगा काढून पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा सरसकट मंजूर करण्याची मागणी शेतकरी करत आहे.
चौकट
बोंडअळीच्या नुकसानीवर निर्णय नाही
अतिवृष्टीनंतर अचानक सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांवर बोंड अळींचा प्रादुर्भावही झाला होता. तालुका प्रशासनाने बोंडअळींच्या प्रादुर्भावाने शंभर टक्के क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविलेला आहे, मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.