"भावी उपमुख्यमंत्री संजय शिरसाट"; छत्रपती संभाजीनगरात बॅनर, समर्थकांची उत्सुकता शिंगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 11:39 AM2024-12-03T11:39:49+5:302024-12-03T11:41:06+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेसेनेचे सहा आमदार विजयी झाले आहेत. यात आमदार संजय शिरसाट हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मागील पाच वर्षांत व महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारात मंत्रिपदाने हुलकावणी दिलेल्या आमदार संजय शिरसाट यांना नव्या सरकारमध्ये आपण मंत्री होणार असा ठाम विश्वास आहे. अद्याप मुख्यमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी शिरसाट यांच्या समर्थकांनी त्यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून शहरात बॅनर लावले आहे. हे बॅनर शहरवासीयांचे लक्ष वेधत आहे.
महायुतीच्या सरकारचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी होईल, अशी घोषणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) या पक्षाचे हे सरकार असेल. मुख्यमंत्री कोण आणि गृहमंत्रिपद कोणाकडे, तसेच कोणत्या पक्षाचे किती मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेतील, याविषयी अद्याप अंतिम निर्णय गुलदस्त्यात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेसेनेचे सहा आमदार विजयी झाले आहेत. यात आमदार संजय शिरसाट हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत.
मंत्री अन् जिल्ह्याचा पालकमंत्री होणार
मागील सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. आता ते जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार असल्याने त्यांनी आपण मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असा दावा सांगितला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये बॅनर लावण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे सिडकोचे अध्यक्ष, तर काहींनी मंत्रिमहोदय म्हणून बॅनर लावलेले आहेत. आता तर उस्मानपुरा चौकालगत कमानीवर भावी उपमुख्यमंत्री म्हणून आ. शिरसाट यांचे बॅनर लावले आहे.