‘फ्युचर मेकर’ कंपनीमुळे ‘फ्युचर’आले धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 07:47 PM2019-06-04T19:47:01+5:302019-06-04T19:49:46+5:30
गुंतवणूकदारांची १३ लाख ३१ हजारांची फसवणूक
औरंगाबाद : साडेसात लाख रुपये गुंतवा तसेच इतरांनाही गुंतवणूक करायला लावून जास्तीत जास्त परतावा आणि इतर फायदे मिळवा, असे आमिष दाखवून हरियाणामधील फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. कंपनीने औरंगाबादेतील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. प्राथमिक स्तरावर कंपनीने १३ लाख ३१ हजार ६३९ रुपयांची फसवणूक केल्याची पाच जणांनी तक्रार नोंदविली आहे.
कंपनीचे संचालक राधेश्याम, बन्सीलाल, जयराम शिंदे, संजय घुले अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरियाणातील हिस्सारमधील फ्युचर मेकर लाईफ केअर कंपनीचे एजंट जगन्नाथ घुले आणि प्रदीप पराड यांनी तक्रारदार रामेश्वर रघुनाथ रोकडे (रा. गजानननगर) यांना सिडकोतील कंपनीच्या कार्यालयात नेले. तेथे कंपनीचे संचालक संजय घुले आणि जयराम शिंदे यांची भेट झाली. कंपनीने जून २०१८ मध्ये बीड बायपासवरील एका हॉटेलमध्ये घेतलेल्या सेमिनारला रामेश्वर हे हजर होते. त्याच महिन्यात सिडकोतील एका मंगल कार्यालयात आणि जुलैमध्ये एका नाट्यगृहात कंपनीने सेमिनार घेतले. साडेसात हजार रुपये गुंतवणूक क रून आयडी घेतल्यास कृषी उत्पादने, आयुर्वेद उत्पादने तसेच अडीच हजार रुपये कमिशन स्वरूपात मिळते, असे सांगितले. शिवाय जास्तीत जास्त आयडी देणाऱ्यांना कंपनीत विविध प्रकारचा रँक मिळतो. प्रत्येक रँकवरील आयडीधारकास वेगवेगळे लाभ कंपनी देते असे सांगितले.
कंपनीने त्यांना कमिशनपोटी ४३ हजार १४२ रुपये दोन टप्प्यात बँकेत जमा केले. मात्र त्यांना कृषी आणि आयुर्वेद उत्पादने दिली नाही. त्यांच्याप्रमाणेच परवेज मोहंमद यांनी ३ लाख ३७ हजार ५०० रुपये, सुनील सुभाष मेहत्रे यांनी २ लाख ३२ हजार ५०० रुपये, प्रमोद साळवे यांनी १ लाख ९ हजार १३९ रुपये तर अप्पासाहेब तुपे यांनी साडेचार लाख रुपये कंपनीत गुंतविले. रोकडे यांच्याप्रमाणे अन्य या गुंतवणूकदारांनाही कंपनीने लाभ दिले नाही. एवढेच नव्हे तर त्यांची मुद्दलही परत केली नाही. कंपनीने आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात येताच सर्वांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
अगोदर दिली बक्षिसे गुंतवणूदार आकर्षित
कंपनीने विविध लोकांना कार दिल्याचे तसेच त्यांना कंपनीने लाखो रुपये कमिशनपोटी दिल्याचे बँक स्टेटमेंट या कार्यक्रमात दाखविण्यात आले. कंपनीच्या संचालकांनी मोठा परतावा आणि इतर लाभ देण्याचे आश्वासन दिल्याने रोकडे यांनी कंपनीत २ लाख २ हजार ५०० रुपये गुंतवणूक करून २७ आयडी खरेदी केल्या.