'भावी मंत्री'; समर्थकांकडून बॅनरबाजी, आमदारांना विश्वास; सत्तार, सावे, शिरसाट, बंब दावेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 11:53 AM2024-11-25T11:53:34+5:302024-11-25T11:55:13+5:30
नव्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नऊ आमदारांपैकी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच नवीन सरकारचा शपथविधी होईल. नव्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नऊ आमदारांपैकी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यात महायुतीच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवीत महाविकास आघाडीचे पानिपत केले. यात अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) व अब्दुल सत्तार (सिल्लोड) हे विद्यमान मंत्री असून सतत चौथ्यांदा विजयी झालेले संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम) व प्रशांत बंब (गंगापूर) हे दोघेही मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अतुल सावे व अब्दुल सत्तार हे दोघे मंत्री आहेत. सत्तांतर घडवून आणण्यात पुढाकार घेतलेले अब्दुल सत्तार आणि जातीच्या गणितात पुढे असलेले अतुल सावे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता दिसते, तर शिवसेनेच्या दुभंगानंतर फुटीर शिंदे सेनेची प्रभावी बाजू मांडणारे आ. संजय शिरसाट यांची पूर्वीपासूनच मंत्री करण्याची मागणी आहे. किंबहुना ठाकरे यांच्या सरकारात मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या शिरसाटांनी शिंदेसेनेची ध्वजा त्वेषाने फडकावली. गेल्या अडीच वर्षांपासून शिंदेसेनेचे प्रवक्तेपदही त्यांनी सांभाळले. मात्र, मागच्या कार्यकाळात मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागू शकली नाही. त्यामुळे ते मध्यंतरी नाराजही होते. संदीपान भुमरे यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या जागी आपली मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी अपेक्षा ते बाळगून होते; परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. मला मंत्रिपद हवे, अशी वेळोवेळी जाहीर मागणी करणाऱ्या आ. शिरसाट यांना मंत्रिपद मिळते की नाही, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ‘लोकमत’शी बोलताना स्वत: आ. शिरसाट यांनीही मंत्रिपद मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.
शिरसाट यांच्या एवढेच मंत्रिमंडळात सिनिअर असलेले आ. बंब हेदेखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार समजले जातात. याशिवाय यंदा जिल्ह्यातून महायुतीच्या दोन महिला अनुराधा चव्हाण (फुलंब्री) व संजना जाधव (कन्नड) विजयी झाल्या असून त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून चांगली कामगिरी बजावली. शिवाय संजनाच्या मागे त्यांचे वडील भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे पाठबळ आहे, तर अनुराधा चव्हाण यादेखील प्रभावी व्यक्तिमत्त्व आहेत. शिंदे यांच्या जवळचे म्हणून गणले जाणारे खा. संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हेदेखील जि.प.चे सभापती राहिले आहेत. त्यांच्यासाठी खा. भुमरे किती शक्ती पणाला लावतात, हे पाहणेही महत्त्वाचे.
मुंबईला रवाना
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अब्दुल सत्तार, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, आ. प्रशांत बंब हे मुंबईला रवाना झाले आहेत.