१०० कोटींत औरंगाबाद चकाचक ! गुळगुळीत रस्ते, रंगरंगोटी, रोषणाईने सौंदर्यीकरणात ‘चार चाँद’
By मुजीब देवणीकर | Published: February 23, 2023 08:09 PM2023-02-23T20:09:03+5:302023-02-23T20:09:26+5:30
दरवर्षी सौंदर्यीकरणावर ५० कोटींची तरतूद हवी
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराचा चेहरामोहराच बदलून टाकण्यात आला. अवघ्या १०० कोटी रुपयांमध्ये ही किमया महापालिकेसह विविध शासकीय कार्यालयांनी केली. महापालिकेने दरवर्षी अर्थसंकल्पात शहर सौंदर्यीकरणासाठी किमान ५० कोटींची तरतूद करायला हवी, अशी मागणी होत आहे.
राज्याच्या पर्यटनाची राजधानी असा दर्जा औरंगाबादला देण्यात आला. दरवर्षी विविध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. पर्यटन उद्योग शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा ठरू शकतो, या दृष्टीने कधीच भरीव काम करण्यात आले नाही. जी-२० परिषदेच्या निमित्ताने दोन ते अडीच महिन्यांमध्ये शहरातील मुख्य रस्त्यांचा चेहरामोहराच बदलण्यात आला. गुळगुळीत रस्ते, दुभाजक, त्यामध्ये आकर्षक झाडे, फुले, रंगरंगोटी पाहून औरंगाबादकरांना आश्चर्य वाटू लागले. रात्री जालना रोडवरील रोषणाई शहराच्या सौंदर्यीकरणात आणखी ‘चार चाँद’ लावत आहे.
राज्य शासनाने जी-२० साठी महापालिकेला फक्त ५० कोटी दिले. त्यामध्ये ८२ कामे करण्यात आली. विमानतळापासून ते मकबऱ्यापर्यंतच्या विकास कामांचा यात समावेश आहे. फूटपाथ, दुभाजक, रस्त्याच्या कडेला झाडे, जाळी लावणे, सलीम अली सरोवराचे सौंदर्यीकरण, वाहतूक बेट आदी. कामे करण्यात आली. रात्री फिरताना आपण विदेशातील एखाद्या शहरात आल्याचा ‘फिल’ येतोय.
सा. बां. विभाग
सा. बां. विभागाला २० कोटींचा निधी प्राप्त झाला. सा.बां.ने जालना रोड, जळगाव रोड, व्हीआयपी रोड गुळगुळीत करून दिले. याशिवाय अन्य बरीच छोटी-छोटी कामे या विभागाकडून करण्यात आली.
पर्यटन विभागाचा निधी
राज्याच्या पर्यटन विभागाने विविध पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी तब्बल १६ कोटींचा निधी दिला. स्थानिक पर्यटन विभागाकडून ही कामे करण्यात आली.
रस्ते विकास महामंडळ
रस्ते विकास महामंडळाने त्यांच्याकडील किमान ५ कोटी रुपये शहर सौंदर्यीकरणासाठी खर्च केले. जी-२० मध्ये या विभागाचाही मोठा हातभार लागला.
महावितरणची भूमिका
महावितरणची भूमिका जी-२० मध्ये महत्त्वाची ठरली. कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी, रस्ते, फूटपाथ केल्यावर उघड्या डी.पी. आणि रस्त्यात अडसर ठरणारे विजेचे पोल त्रासदायक ठरत होते. पोलवर रंगरंगोटी, डी.पी.ला चारही बाजूने आवरण इ. कामांवर १ कोटी ७५ लाख रुपये खर्च झाले. हा निधी मनपा देणार आहे.
शहर सुंदर दिसू लागले
शहर सौंदर्यीकरणासाठी दोन ते तीन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. विविध शासकीय कार्यालयांनी, राज्य शासनाने सढळ हाताने मदत केली. त्यामुळे शहर स्वच्छ, सुंदर दिसतेय.
- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी.
मनपा अर्थसंकल्पात तरतूद करावी
सामान्य माणूस म्हणताेय, शहर सुधारलं. एका महिलेने सोशल मीडियावर म्हटले, मला जी-२० माहीत नाही. मात्र, जी-२० दरदोन वर्षांनी शहरात व्हावे. उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. मनपाने दरवर्षी ५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी.
- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक.