G20 Summit: डब्ल्यू २० चा एकच निष्कर्ष; महिलांचा आर्थिक उत्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 02:00 PM2023-03-01T14:00:39+5:302023-03-01T14:01:14+5:30
जी २० च्या सत्रांचा समारोप : परिषदेआडून भाजपचा अजेंडा राबवत नसल्याचा केला दावा
छत्रपती संभाजीनगर : डब्ल्यू २० च्या ७ पॅनलच्या चर्चेतून ७० प्रस्ताव महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे सगळ्या चर्चेला सर्वांनी एकमताने मान्यता दिली असून, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या चर्चेतून महिलांचा आर्थिक उत्कर्ष हा एकमेव निष्कर्ष दीड दिवसाच्या मंथनातून पुढे आला आहे. या परिषदेच्या आडून भाजपचा अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राबविण्याचा कोणताही उद्देश नसल्याचा दावाही परिषदेच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष डॉ.संध्या पुरेचा यांनी केला.
महिलांसाठी धोरणे आखणारी महत्त्वाची परिषद असताना राज्यातील तज्ज्ञ यामध्ये नाहीत, असा आरोप होत आहे. परिषदेआडून केंद्र शासनाचा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर प्रचार होत असल्याचाही आरोप आहे. याचे खंडन करीत स्वराज व डॉ.पुरेचा म्हणाल्या, भाजपचा याच्याशी काहीही संबंध नाही. बान्सूरी स्वराज म्हणाल्या, जी २० चे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. मोदी महिलांना प्राधान्य देणारी धाेरणे आखत आहेत. कलेची देवाण-घेवाण झाली पाहिजे, कलाकारांना निवृत्ती वेतन मिळावे, अशा सूचना आल्या. त्यावर चर्चा होईल, त्यानंतर नवीन धोरण ठरेल, असे पुरेचा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, आम्ही राजकीय नाही, तर सामाजिक संघटना म्हणून काम करतो. त्यामुळे कोणाकडे काय वाईट आहे, त्यापेक्षा काय चांगलं आहे, त्यावर चर्चा केली.
चर्चेचा झीरो ड्राफ्ट तयार
जी २० च्या डब्ल्यू २० च्या अँगेजमेंट ग्रुपचे मंथन चांगले झाले. सर्व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची चर्चेतील ठरावाना एकमताने मान्यता दिली. चर्चेचा झीरो ड्राफ्ट तयार झाला आहे. टास्क फोर्स १५ दिवसांच्या आत सर्व तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल. सगळ्या प्रतिनिधींशी ऑनलाइन चर्चा करून दुसरा मसुदा तयार होईल. जी २०च्या प्रमुखांनी घोषणा केल्यानंतर मे महिन्यांत तिसरा मसुदा तयार होईल. जूनमध्ये कम्युनल की तयार होईल. त्यानंतर, मसुदा पंतप्रधान व जागितक लीडरशिपकडे जाईल. त्यानंतर, महिला आर्थिक सक्षमीकरण धोरणांची घोषणा होईल. आम्ही जे सुचविले, ते स्वीकारून २० पैकी १२ गुण मिळाले, तर अन्यथा अपयश समजले जाईल.
- डॉ.संध्या पुरेचा, अध्यक्षा डब्ल्यू २०.
महिलांना भविष्य म्हणून पाहतो आहोत
महिलांना योजनांचे साधन नाही, तर भविष्य म्हणून पाहतो आहोत. कोणाशी आपण तुलना करणे चुकीचे आहे, त्यामुळे विचारांचे देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे. घरी काम करणाऱ्या महिलांच्या कामाची किंमत केली जात नाही. मात्र, देशाच्या प्रगतीत तिचा सहभाग असतो, याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याकडे मूल हवे की नको; पाहिजे असल्यास मोफत उपचार, रजा देण्याची कायदेशीर तरतूद आहे.
- बान्सूरी स्वराज, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय.
बहुआयामी विषयांवर चर्चा
माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे. ताजमहाल आणि बीबी का मकबरा या दोन्ही पर्यटनस्थळांच्या तुलनात्मक इतिहासाची मला माहिती आहे. त्यानंतर हे स्थळ पाहणे म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. परिषदेत बहुआयामी विषयांवरील चर्चेतून अनेक मुद्दे नव्याने समजले.
- चेर्ली मिलर, संचालक, डिजिटल लीडरशिप इन्स्टिट्यूट, युरोपिअन युनिअन
प्रशासनाचे कौतुक
मी दोन महिन्यांपूर्वी शहरात येऊन गेले होते. प्रशासनाने कमी कालावधीत जबरदस्त काम करत शहराचा नकाशाच बदलला आहे. सकाळी सूर्योदय, लेण्या, बीबी का मकबरा पाहून प्रचंड आनंद वाटला. खरोखर जिल्हा आणि पोलिस प्रशासन कौतुकास पात्र आहेत.
- ग्ल्याडीस नायर, आयक्रिअट, अहमदाबाद