G20 Summit: विदेशी पाहुण्यांनी घातली महिलांना जग बदलाची साद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 01:55 PM2023-02-27T13:55:16+5:302023-02-27T13:56:27+5:30
जी-२० चा अंतर्गत भाग असलेल्या वूमन्स- २० हा २०१५ मध्ये स्थापन झालेला जगभरातील २० विकसनशिल देशांचा गट आहे.
छत्रपती संभाजीनगर : जी- २० शिखर परिषदे निमित्त शहरात दाखल झालेल्या १९ देशांतील महिलांनी रविवारी स्थानिक महिलांसोबत संवाद साधत ‘चला जग बदलू या’, अशी साद घातली.
एमजीएमच्या रूख्मिणी सभागृहात जनभागिदारी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राेहयोमंत्री संदीपान भुमरे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, महिला- २० परिषदेच्या चेअरपर्सन संध्या पुरेचा, समन्वयक धरित्री पटनायक यांच्यासह आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सुमारे एक हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महागामीच्या कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यानंतर एमजीएमचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. डॉ. संध्या पुरेचा यांनी प्रास्तविक करताना शिखर परिषदेचे महत्त्व सांगितले. काही वर्षांपासून महिलांचा दर्जा उंचावण्यासाठी ही संस्था काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिष्टमंडळाच्या नेत्या डॉ. फराहदिभा टेनारिलेम्बा यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधनाता इंडोनिशयाने स्थापन केलेल्या कार्यक्रमामध्ये भारत सातत्य राखेल, अशी आशा व्यक्त केली. डॉ. टेनरिलेम्बा यांनी महिला-२० परिषदेने इंडोनेशियातील नऊ लाख कोटींहून अधिक महिलांवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. भारत जगातील विकसनशिल देशांचे नेतृत्व राखेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
रशियाच्या प्रतिनिधी, एलेना म्यकोटनिकोवा यांनी हवामान सक्रियतेचे महत्त्व आणि हवामान बदलाचा सामना करण्याची गरज व्यक्त केली. दक्षिण कोरियाच्या एंजेला जू-ह्यून कांग या भारतातील विविध धर्म आणि एकोपा याबद्दल प्रभावित झाल्या. त्यांनी महिलांना समाजाच्या उन्नतीसाठी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे नमूद केले. जपानच्या प्रतिनिधी सातोको कोनो यांनी महिलांसाठी उद्योजकतेचे महत्त्व आणि आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला.
प्रश्नोत्तराच्या फेरीत जाणून घेतल्या समस्या
प्रश्नोत्तराच्या फेरीतून आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने स्थानिक महिलांचे प्रश्न जाणून घेतले. प्राचार्य रेखा शेळके यांनी औरंगाबादेतील महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न उपस्थित केला, तर डॉ. कानन येळीकर यांनी महिलांतील रक्तक्षयांकडे लक्ष वेधले. अन्य एका महिलेने बालविवाह, महिला अत्याचारांच्या घटनांकडे प्रकाश टाकला.
काय आहे डब्ल्यू- २०
जी-२० चा अंतर्गत भाग असलेल्या वूमन्स- २० हा २०१५ मध्ये स्थापन झालेला जगभरातील २० विकसनशिल देशांचा गट आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येचा ५० टक्के भाग असलेल्या महिलांच्या समस्या, त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान, त्यांची भरभराट आणि त्यांच्या विकासातील अडथळे दूर करण्यासाठी ही संस्था काम करते. यंदा भारताकडे जी- २० चे अध्यक्षपद आहे. यानिमित्त जगातील १९ देशांतील महिला प्रतिनिधी शहरात दाखल झाले आहेत.