Video: परदेशी पाहुणे दांडिया, लेझीमच्या प्रेमात; झिंग...झिंगाट...गाण्यावरही थिरकले
By विकास राऊत | Published: February 28, 2023 08:01 PM2023-02-28T20:01:59+5:302023-02-28T20:03:30+5:30
दांडिया, लेझीम, लोकनृत्यासह महाराष्ट्रीयन जेवणाचा घेतला आनंद
छत्रपती संभाजीनगर : जी-२० अंतर्गत डब्ल्यू २० परिषदेनिमित्त शहरात आलेल्या विदेशी पाहुण्यांनी सोमवारी रात्री मराठी गीतांवर ठेका धरून मनमुराद आनंद लुटला. झिंग....झिंगाट... गाण्यावर परदेशी पाहुणे थिरकले. सोबतच दांडिया, लेझीम, लोकनृत्यासह महाराष्ट्रीयन जेवणाचा त्यांनी आनंद घेतला.
जवळपास १५० महिला तज्ज्ञांचा सहभाग होता. साजूक तुपासह खास महाराष्ट्रीय पूरणपोळी, बाजरी, ज्वारीची भाकरी, वरवंट्यावर वाटलेल्या ठेच्याचा बेत रात्री जेवणात होता. खाद्य प्रकारांचे पाहुण्यांनी कौतुक केले. महिला-२० परिषदेनिमित्त २० देशांच्या महिला प्रतिनिधी शनिवारपासून शहरात होत्या. दि. २७ रोजी रात्री प्रशासनाने हॉटेल ताज विवांता येथे महाराष्ट्रीय जेवणाची सोय केली. ढोल-ताशे, लेझीम नृत्य सादर करत व गुलाबाची उधळण करत हॉटेलमध्ये पाहुण्यांचे फेटा बांधून स्वागत केले. महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या लोकनृत्याचे आयोजन करण्यात आले. लोकनृत्य पाहून अनेक महिलांनी स्टेजचा ताबा घेत ताल धरला, तर काहींनी लेझीम, दांडिया हाती घेतले. हे कडधान्य वर्ष असल्यामुळे प्रामुख्याने कडधान्यांनी युक्त असे जेवण होते.
ज्वारीचा हुरडा, बाजरीची खिचडी, सोलकढी, बाजरी, ज्वारीची भाकरी, विविध प्रकारच्या चटण्या, भाजी, शहराची ओळख असलेला नान-खलिया असा बेत होता. सांस्कृतिक कार्यक्रमात शहरातील सुरेश विधाते यांनी व्हायोलिन वादन केले. महिला-२० परिषदेच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी विधाते यांना दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले.
छत्रपती संभाजीनगर : जी-२० अंतर्गत डब्ल्यू २० परिषदेनिमित्त शहरात आलेल्या विदेशी पाहुण्यांनी झिंग....झिंगाट... गाण्यावर ठेका धरला pic.twitter.com/QVe5uipbdy
— Lokmat (@lokmat) February 28, 2023
पाटा-वरवंट्यासाेबत सेल्फी...
पाटा-वरवंटा हॉटेल आवारात ठेवण्यात आला होता. त्याठिकाणी असलेल्या मुलीसोबत अनेकांनी सेल्फी घेतली. पाट्यावर वाटलेल्या मसाल्याच्या भाजीची चव न्यारीच असते. त्यामुळे त्याचे अनेकांना आकर्षण असल्याचे दिसले.