G20 Summit: राजकारणातील संधीतून लैंगिक समानता येणे शक्य: बान्सुरी स्वराज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 03:39 PM2023-03-01T15:39:13+5:302023-03-01T15:39:57+5:30

‘महिला-नेतृत्वातील विकास सक्षम करणारे धोरण आणि कायदेशीर चौकट’ या सत्रात विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी धोरण आणि कायदेशीर फ्रेमवर्कच्या भूमिकेवर लक्षवेधी चर्चा झाली.

G20 Summit: Gender equality possible through opportunity in politics: Bansuri Swaraj | G20 Summit: राजकारणातील संधीतून लैंगिक समानता येणे शक्य: बान्सुरी स्वराज

G20 Summit: राजकारणातील संधीतून लैंगिक समानता येणे शक्य: बान्सुरी स्वराज

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जगभरातील महिलांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या महत्त्वावर भर देणे गरजेचे आहे. सर्व महिलांना त्यांचे मत असले पाहिजे. राजकारणातील महिलांना संधी हा लैंगिक समानता आणण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील भारताच्या अधिवक्ता बन्सुरी स्वराज यांनी व्यक्त केले. जी-२० अंतर्गत डब्ल्यू-२० च्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात विविध विषयावर मंथन झाले.

‘महिला-नेतृत्वातील विकास सक्षम करणारे धोरण आणि कायदेशीर चौकट’ या सत्रात विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी धोरण आणि कायदेशीर फ्रेमवर्कच्या भूमिकेवर लक्षवेधी चर्चा झाली. यूएसएच्या मिशेल सिल्व्हरथॉन यांनी संचालन केले. ॲड. स्वराज यांनी कायदेशीर बाबी आणि भारतात महिलांना संधी यावर सकारात्मक भाष्य केले. सिल्व्हरथॉन म्हणाल्या, आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. यूए वुमनच्या सुसान जेन, दक्षिण आफ्रिकेच्या प्रा. नार्निया बोहलर, स्पेनमधील एमएलके लॉ फर्मच्या संस्थापक कॅथरिना मिलर यांनी महिलांच्या प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी कायदे आणि धोरणात्मक उपाययोजनांबाबत चर्चा केली.

अपारंपरिक महिलांनी मिळविलेले यश या विषयावरील विशेष सत्राने दुसऱ्या दिवशीच्या मंथनाला सुरुवात झाली. प्रास्ताविक राज्यसभा खा. डॉ. सोनल मानसिंग यांनी केले. शहरातील महिलांच्या योगदानावर तयार केलेल्या 'अवया' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. जम्मू आणि काश्मिरी ग्रामीण उपजीविका अभियानाच्या सदस्या झुबेदिया बीबी यांनी ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या उपक्रम, योजनांची मदत झाल्याचे नमूद केले.

भारतीय नौदलातील महिलांचा सहभाग
शाझिया खान, दिशा अमृत, तविशी सिंग आणि स्वाती भंडारी या नौदलात कार्यरत महिलांनी जुनाट विचारांना खोडून सामाजिक जडणघडणीच्या वर स्वत:ला पोहोचविले. नेव्ही वेल्फेअर अँड वेलनेस असोसिएशनच्या प्रतिनिधी दीपा भटनायर यांनी समाजाच्या वाढीसाठी आणि त्यांच्या पुढाकारातून महिला सक्षमीकरणात नौदलाच्या पत्नींनी बजावलेली भूमिका यावर मत व्यक्त केले.

७० विषयांवर चर्चा
दोन दिवसांतील सत्रातून झालेल्या चर्चा महिलांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असा दावा समारोपप्रसंगी परिषदेच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी केला. महिला उद्योजकांचा सक्रिय सहभाग, सक्षमीकरणासाठी पावले उचलणे आणि लिंग समानता वाढविणाऱ्या धोरणांसाठी काम करण्याचा मानस चर्चेअंती व्यक्त करण्यात आला. दोन दिवसांत ७० विषयांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: G20 Summit: Gender equality possible through opportunity in politics: Bansuri Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.