G20 Summit: छत्रपती संभाजीनगरचे मुख्य रस्ते बनले सेल्फी पॉइंट! रात्री २ पर्यंत नागरिकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 05:06 PM2023-02-27T17:06:03+5:302023-02-27T17:24:24+5:30

अवघ्या १०० कोटी रुपयांमध्ये शहर चकाचक झाले. शहराचे बदलेले हे रूप नागरिकांना प्रचंड विलोभनीय वाटत आहे.

G20 Summit: The main streets of Chhatrapati Sambhajinagar have become selfie points! Crowd of citizens till 2 am | G20 Summit: छत्रपती संभाजीनगरचे मुख्य रस्ते बनले सेल्फी पॉइंट! रात्री २ पर्यंत नागरिकांची गर्दी

G20 Summit: छत्रपती संभाजीनगरचे मुख्य रस्ते बनले सेल्फी पॉइंट! रात्री २ पर्यंत नागरिकांची गर्दी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहरात सौंदर्यीकरणाची प्रचंड कामे करण्यात आली. प्रमुख रस्त्यांवर आकर्षक रोषणाई, पाण्याचे कारंजे, सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले. दररोज संध्याकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत नागरिक सहकुटुंब सेल्फी काढण्यासाठी जालना रोड, सुभेदारी इ. भागांत गर्दी करीत आहेत. या गर्दीला आवर घालण्यासाठी पाेलिसांना दखल घ्यावी लागत आहे.

महापालिका दरवर्षी किमान ४०० ते ५०० कोटी रुपयांची विकास कामे करते. ही कामे ११५ वॉर्डांमध्ये असतात. लोकप्रतिनिधी कधीच मुख्य रस्ते, सौंदर्यीकरण याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे शहर सौंदर्यीकरणावर मागील चार दशकांत एक रुपयाही खर्च करण्यात आला नाही. पर्यटक, उद्योजक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी शहराची ब्रँडिंग आवश्यक आहे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराला ब्रँडिंगची मोठी संधी चालून आली. राज्य शासनाने महापालिकेला सढळ हाताने ५० कोटींची मदत केली. या शिवाय जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग, महावितरण इ. शासकीय कार्यालयांनीही जवळपास ५० काेटी रुपये खर्च केले. अवघ्या १०० कोटी रुपयांमध्ये शहर चकाचक झाले. शहराचे बदलेले हे रूप नागरिकांना प्रचंड विलोभनीय वाटत आहे. महावीर चौक ते चिकलठाण्यापर्यंत नागरिक सहकुटुंब दुचाकी, चारचाकीवर मनोहारी दृश्य आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी येत आहेत. कारंजे, ग्लो गार्डनच्या झाडांजवळ उभे राहून सेल्फी घेण्याचा मोह नागरिकांना आवरत नाही.

पोलिस म्हणाले, आता घरी जा...
सिडको बसस्थानक चौकात तर शनिवारी रात्री १.३० वाजता अनेक नागरिक सेल्फी काढत होते. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी नागरिकांना ‘आता पुरे झाले, घरी जा’ असा प्रेमाचा सल्ला दिला. सिडको बससस्थानक ते हर्सूल टी पॉइंटपर्यंतचा रस्ताही आकर्षक दिवे, झाडांनी सजविण्यात आला. हर्सूल टी पॉइंट येथेही नागरिक आवर्जून सेल्फी काढत होते. सलीम अली सरोवरात दिवे, पाण्याचे कारंजे लावले. या ठिकाणीही अनेक कुटुंब रात्री उशिरापर्यंत होते. लेबर कॉलनी, रंगीन गेट, जिल्हाधिकारी निवासस्थान, टाउन हॉल उड्डाणपुलावरही गर्दी बघायला मिळाली.

Web Title: G20 Summit: The main streets of Chhatrapati Sambhajinagar have become selfie points! Crowd of citizens till 2 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.