G20 Summit...अन् विदेशी पाहुण्यांनी पैठणी शेला धरला हृदयाशी; पारंपारिक स्वागताने भारावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:32 IST2023-02-27T13:31:44+5:302023-02-27T13:32:54+5:30
विमानतळावर विदेशी पाहुण्यांचे स्वागत : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी जिंकली मने

G20 Summit...अन् विदेशी पाहुण्यांनी पैठणी शेला धरला हृदयाशी; पारंपारिक स्वागताने भारावले
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी दाखल झालेल्या पाहुण्यांचे विमानतळावर महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात आले. औक्षण करून महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्र असलेला पैठणी शेला पाहुण्यांच्या खांद्यावर टाकला. तेव्हा क्षणभर पाहुणे या वस्त्राकडे पाहतच राहिले. काहींनी हा पैठणी शेला हृदयाशीही धरला.
जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या वुमन- २० परिषदेसाठी रविवारी सकाळी परदेशी पाहुण्यांचे शिष्टमंडळ चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यावेळी जिल्हा प्रशासन, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. विमानतळ संचालक डी. जी. साळवे, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, कुलदीप जंगम, तहसीलदार ज्योती पवार, तहसीलदार शंकर लाड, विक्रम राजपूत, शीतल राजपूत, शैलेश राजमाने, विमानतळाचे शरद येवले आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. नऊवारी साडी परिधान केलेल्या महिलांनी या पाहुण्यांचे औक्षण केले. त्यानंतर अंजली धानोरकर, ज्योती पवार यांनी पैठणी शेला, पुष्पहाराने त्यांचे स्वागत केले.
लेझीम पाहण्यात मग्न
मुकुंदवाडी येथील मनपा शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थिनींनी लेझीम खेळताना पाहण्यात पाहुणे मग्न झाले. यावेळी शिक्षिका अंजली चिंचोलीकर यांची उपस्थिती होती.