गडकरी यांचा ‘गोल्डन ट्रँगल’ तीन संस्थांच्या फेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:00 PM2018-10-02T15:00:23+5:302018-10-02T15:01:29+5:30
केंद्रीय दळणवळणमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या रस्त्यांची कामे संथगतीने; घोषणा चौपदरीकरणाची, काम द्विपदरी.
- विकास राऊत
औरंगाबाद : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्लॅनमधील सुमारे १४ हजार कोटींची कामे ‘पीडब्ल्यूडी’,‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआरडीसी’ कडे वर्ग केली आहेत. चौपदरीकरणासाठी नियोजित केलेल्या रस्त्यांवर १० हजार वाहनांपेक्षा जास्त वाहतूक असूनही ते रस्ते द्विपदरी, तीनपदरी करण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या घोषणेला येत्या २५ डिसेंबर रोजी ३ वर्षे पूर्ण होतील. सदरील कामांवर एकत्रितपणे कोणत्याही संस्थेचे नियंत्रण नसल्यामुळे कुठे काय चालले आहे हे काही समजण्यास मार्ग नाही.
२५ डिसेंबर २०१५ रोजी गडकरी यांनी १८ हजार कोटी रुपयांच्या गोल्डन ट्रँगल कामांची घोषणा केली. त्यानंतर वर्षभरातच त्या कामांचे तुकडे पाडण्यात आले. सीआरएफ, एनएचएआय, पीडब्ल्यूडी आणि आता एमएसआरडीसी मिळून हा दळणवळण विकास कार्यक्रम राबविण्याचे ठरले असून, सर्व कामे प्रगतिपथावर असल्याचा दावा केला जात आहे. गडकरींच्या घोषणेतील बहुतांश रस्ते द्विपदरी आणि तीनपदरीकरणात वर्ग केले आहेत. सोलापूर-धुळे महामार्ग आणखी वर्षभर पूर्ण होणे शक्य नाही. एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता सुनील देशमुख म्हणाले की, एमएसआरडीसीकडे वर्ग केलेली कामे प्रगतिपथावर आहेत. एनएचएआय आणि पीडब्ल्यूडीकडील कामांबाबत काही सांगता येणार नाही.
एनएचएआय, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसीकडे कामे
एनएचएआय, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी या तीन संस्थांकडे कामे वर्ग केली आहेत. औरंगाबाद ते वैजापूर ते कोपरगाव ते शिर्डी या १५० कि़मी.पैकी १०० कि़मी.साठी तीन तुकड्यांत तर औरंगाबाद ते सिल्लोड ते अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर ते बोधवडमार्गे मुक्ताईनगर पिंप्री ते बºहाणपूर या ४०० कि.मी. पैकी १०० कि़मी. रस्त्याचे दोन तुकडे करून निविदा मागविण्यात आल्या. औरंगाबाद ते जालनामार्गे वाटूर-मंठा ते बोरी-झरीमार्गे परभणी हा १२५ कि़मी.चा रस्ता तसेच खामगाव-मेहकर ते सुलतानपूर ते माजलगाव हा ४५० कि़मी.च्या रस्त्याचे आठ तुकड्यांत काम होत आहे.
७२५ कि.मी.चे रस्ते एमएसआरडीसीकडे
‘गोल्डन ट्रँगल’ मधील नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे असलेले ७२५ कि़ मी.चे रस्ते काढून ते राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आले आहेत. १८ हजार कोटींच्या कामांपैकी ८ हजार २५० कोटींची ती कामे आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि विदर्भासह खान्देश व पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे हे रस्ते ८ हजार २५० कोटी रुपयांतून होणार आहेत. १८ ते २४ महिन्यांचा कालावधी या रस्त्यांच्या बांधकामांसाठी असणार आहे. ७२५ कि़मी.चे हे रस्ते १५ तुकड्यांमध्ये सुरू झाले असून, प्रगतिपथावर असल्याचा दावा एमएसआरडीसी सूत्रांनी केला.
सगळ्या कामांची खिचडी
१८ हजार कोटी रुपयांच्या अनेक रस्त्यांच्या कामांंची खिचडी झाली असून, ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.
- औरंगाबाद ते फुलंब्रीमार्गे सिल्लोड ते पहूर ते जळगाव हा १५५ कि़ मी. चा रस्ता १५५० कोटींचा आहे. खा.रावसाहेब दानवे यांनी या रस्त्यासाठी निधी मिळाल्याचे जाहीर केले आहे. एमएसआरडीसीच्या यादीत हा रस्ता आहे.
- औरंगाबाद ते सिल्लोड ते अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर ते मुक्ताईनगर हा ४०१ कि़ मी. रस्ता ४ हजार १० कोटींतून होईल, असे सांगण्यात आले. त्या कामाचे काय झाले जाहीरपणे कुणीही सांगत नाही.
- औरंगाबाद ते वैजापूर ते नाशिक १८३ कि़ मी. रस्ता १८३० कोटींतून होईल, असे सांगण्यात आले. त्याचे पुढे काहीही झाले नाही. औरंगाबाद ते वैजापूर ते कोपरगावमार्गे शिर्डी हा १५० कि़ मी. रस्ता १५०० कोटींतून होईल, असे जाहीर करण्यात आले.
- औरंगाबाद ते परभणी या १२५० कोटींतून १२५ कि़ मी.चा हा रस्ता आहे. हाच रस्ता खामगाव ते सांगोला यामार्गे असून, ४५०० कोटींतून ४५० कि़ मी. तो रस्ता करण्याचे दाखविण्यात आले आहे. या दोन्ही रस्त्यात वाटूर फाटा केंद्रस्थानी आहे.