मोबाईलवरील लुडो खेळावर पैसे लावून जुगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 07:35 PM2019-07-26T19:35:24+5:302019-07-26T19:37:25+5:30
करमणूक म्हणून पोलिसांचे दुर्लक्ष
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : मोबाईलच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऑनलाईन खेळ खेळून करमणूक केली जाते; परंतु आॅनलाईन पत्ते आणि आता लुडो नावाने खेळावर पैसे लावून जुगार जोमात सुरू आहे. करमणूक म्हणून पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने शहरात विद्यार्थी, नागरिकांसह जुगारात गुंतलेली अनेक टोळकी दिसत आहेत.
व्यावसायिक चार मित्र एकत्र येऊन रिकाम्या वेळेत आॅनलाईन लुडो नावाचा चंफूल हा खेळ डाऊनलोड करून खेळताना अनेक जण दिसत आहेत. कुणी त्यांना हटकल्यास टाईमपास म्हणून खेळतोय, भाऊ खेळायचे का, असा प्रतिसवाल ते करतात. लहान मुलांच्या करमणुकीसाठी मोबाईलवर विविध खेळ असले तरी प्रत्येकाला त्यातून काही तरी बहाणा पाहिजे. याप्रमाणे त्या खेळाला जुगाराचे स्वरूप निर्माण करून दिले आहे. रात्री-अपरात्री किंवा हॉटेलवर चार मित्र चहा पार्टी जरी असेल, तर त्यावर खेळून जो हरला त्यावर खर्च लावतात; परंतु आता केवळ पार्टी नव्हे, तर पैसे लावून खेळविला जाणारा जुगार छुप्या मार्गाने शहरात जोरात सुरू झाला आहे. वाहनात प्रवासादरम्यानदेखील हा खेळ सुरू होतो. आॅनलाईन पॉइंट व त्यानुसार पैसे जिंकण्याची चुरस लागते. करमणूक म्हणून खेळता-खेळता आता पैसे लावून जुगार खेळणे सुरू आहे. अनेक जुगारी त्याला कमाईचे साधन समजू लागले आहेत. बौद्धिकतेच्या खेळात सर्वच तरबेज असतात असे नाही; परंतु लक्षपूर्वक खेळून दुसऱ्याला हरविण्यासाठी अधिक जोर लावला जातो. चातुर्याने खेळलेल्या चालीनुसार जास्त पॉइंट मिळून खेळात जिंकतो.
पोलिसांच्या नजरेत हा गुन्हाच
पैसे लावून खेळला जाणार हा जुगार पोलिसांच्या नजरेत गुन्हाच आहे. करमणुकीऐवजी पैसे लावून त्या खेळाचा अर्थार्जनासाठी कुणी खेळत असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा प्रकारच्या कारवाया झालेल्या आहेत. रात्रीची गस्त वाढविली असून, तसे कोणी मोबाईलवर आॅनलाईन पैसे लावून खेळ खेळताना आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाणार, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.