राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ; संवेदनशील जायकवाडी धरण दहा दिवसांपासून अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 07:42 PM2022-06-17T19:42:39+5:302022-06-17T19:43:27+5:30
थकीत बिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने धरण नियंत्रण कक्षात मेणबत्ती लावून कामकाज सुरू आहे.
पैठण (औरंगाबाद) : मराठवाड्याची लाईफ लाईन व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेले जायकवाडी धरण गेल्या दहा दिवसांपासून अंधारात आहे. एक लाखांचे बिल थकल्याने महावितरणने टोकाची असंवेदनशील भूमिका घेत थेट धरणाचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
जून महिन्यापासून धरणात आवक होते, त्या दृष्टीने धरणावर अनेक उपाय योजना केल्या जातात. या कालावधीत धरणावर बारीक लक्ष ठेवले जाते. मात्र, थकीत बिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने धरण नियंत्रण कक्षात मेणबत्ती लावून कामकाज सुरू आहे. जायकवाडी धरणाचे नियमित बील अदा करण्यात येते. महामंडळाच्या कार्यवाहीत एखादे बील भरण्यास थोडा विलंब होऊ शकतो राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन जायकवाडी धरणावरील विद्युत पुरवठा खंडीत करू नये, असे लेखी पत्र जायकवाडी प्रशासनाने महावितरण कंपनीला दिलेले आहे. परंतु या पत्राला केराची टोपली दाखवत जानेवारी महिन्यात सुध्दा धरणाचा पुरवठा खंडीत करण्यात आला होता. धरण सुरक्षेचे गांभीर्य लक्षात न घेता थेट विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
बिल भरले आता रिकनेक्शन चार्जेस भरा....
दरम्यान, धरणाचे थकीत वीज बील अदा करण्यात आले आहे. परंतु, आता रिकनेक्शन जार्जेस भरा तरच विद्युत पुरवठा जोडण्यात येईल अशी भूमिका महावितरणने घेतल्याने बिल भरूनही धरण परिसर अंधारात आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे महावितरण कंपनीला काही देणेघेणे नाही का? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे...
धरण सुरक्षितता कायदा २०२१ नुसार मर्मस्थळ म्हणून घोषित केलेल्या धरणाचा विद्युतपुरवठा खंडीत करता येत नाही. धरण सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी महावितरण कंपनीस सूचना द्याव्यात अशी मागणी जेष्ठ समाजसेवक दिनेश पारीख यांनी केली आहे.