पर्यटनाचा आनंद घेताना ‘गणपत्ती बाप्पा मोरया...’; वेरूळ लेणी, देवगिरी किल्ल्यात गणेश दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 13:48 IST2024-09-14T13:47:24+5:302024-09-14T13:48:54+5:30
फिरण्याचा आनंद घेताना ‘गणपती बाप्पा मोरया...’ असा जयघोष आपसूकच मुखातून बाहेर पडतो.

पर्यटनाचा आनंद घेताना ‘गणपत्ती बाप्पा मोरया...’; वेरूळ लेणी, देवगिरी किल्ल्यात गणेश दर्शन
छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाला गेल्यानंतर निसर्गाचा, ऐतिहासिक स्थळांच्या सौंदर्याचा आनंद घेताना तुम्हाला गणरायाचेही दर्शन घेता येत आहे. कारण जिल्ह्यातील काही ऐतिहासिक अशा स्थळांवर गणेश शिल्प, गणपती मंदिर आहेत. त्यामुळे फिरण्याचा आनंद घेताना ‘गणपती बाप्पा मोरया...’ असा जयघोष आपसूकच मुखातून बाहेर पडतो.
वेरुळ लेणीत गणपती दर्शन
जगप्रसिद्ध वेरुळ लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. याच वेरुळ लेणीत लेणी क्रमांक १४, १६ (कैलास), १६ ए, २१ (रामेश्वर लेणे) आणि २२ मध्ये सप्तमातृका शिल्पपटात गणपतीच्या मूर्ती आहेत. लेणी क्रमांक १६ आणि २१ या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळच गणेशमूर्ती आढळते. त्यापाठोपाठ लेणी क्रमांक १५ (दशावतार लेणे) येथे मुख्य गर्भगृहाच्या बाहेर, कैलास लेणीमधील लंकेश्वर लेणी भागात गणेशाचे शिल्प आहे. कैलास लेणीत प्रदक्षिणा पथावरदेखील गणराय विराजमान आहेत. १६ ए या लेणीत गणपती सप्तमातृकांसह उभे आहेत. लेणी क्रमांक २१ च्या बाजूने एक रस्ता वरच्या बाजूला जातो. तेथे पूर्ण शिल्पकाम न झालेला एक लेणी समूह आहे. यातील एका लेणीत ‘श्री’ विराजमान आहेत. याला ‘गणेश लेणी’ असे म्हणतात.
औरंगाबाद बुद्ध लेणीत गणराय
औरंगाबाद बुद्ध लेणीतही गणपतीचे शिल्प आहे. बेगमपुऱ्याकडून येणाऱ्या रस्त्याच्या बाजूने लेणीचा दुसरा गट आहे. या ठिकाणी ६ ते १० क्रमाकांच्या लेणी आहेत. यात क्रमांक ६ मध्ये गणपतीचे शिल्प पाहायला मिळते.
देवगिरी किल्ल्यावर मंदिर, माहितेय?
देवगिरी (दौलताबाद) किल्ल्याच्या पायऱ्या चढून तुम्ही वर गेला असाल. परंतु, वाटेत गणपती मंदिर आहे, हे अनेकांना माहीत नाही. किल्ल्यावर जाताना देखणे असे गणपती मंदिर आहे.