Gandhi Jayanti Special :मी म्हणतो, हा जिल्हा झालाच कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:26 PM2018-10-02T12:26:48+5:302018-10-02T12:27:37+5:30

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... या शहरात जिल्हा मुख्यालय तर आहे; पण ते नावालाच. बसायला माणसेच भरली नाहीत तर ते मुख्यालय घेऊन काय करायचे? रिकाम्या खुर्च्या आणि बिल्डिंग पाहून माघारी फिरतात गोरगरीब बिच्चारे. एक बरे झाले, प्रस्तावित असलेली १२ ते १३ कार्यालये स्थापनच झाली नाहीत. त्यांचीही अवस्था अशीच झाली असती, अगदी स्मशानासारखी. 

Gandhi Jayanti Special: I say, why is this district formed? | Gandhi Jayanti Special :मी म्हणतो, हा जिल्हा झालाच कशासाठी?

Gandhi Jayanti Special :मी म्हणतो, हा जिल्हा झालाच कशासाठी?

googlenewsNext

- विजय पाटील

आज बापूंची जयंती. दरवर्षी २ आॅक्टोबरला त्यांची आठवण येते. गांधीवादाला सर्व जग सलाम करते. मात्र, वाढती हिंसा पाहून त्यांचे नाव आजच्या पिढीच्या विस्मरणात गेले की काय, असेच मला वाटते. आता मी कोण? बापूंच्या तीन माकडांपैकी एक, ‘बुरा मत कहो’ म्हणणारे. जयंतीच्या निमत्ताने बापूंनी मला हिंगोलीत पाठवले. किती किती कौतुक करावे या शहराचे? हा जिल्हा झालाच कशाला, हा माझा पहिला प्रश्न. वाईट बोलायचे नाही, ही बापूंची शिकवण; पण मी आज बोलणार, तुम्हाला बोलते करण्यासाठी. पुन्हा आपले आहेच तोंडावर बोट. हं, तर सिंचनाचा अनुशेष नाही म्हणायला मंजूर झाला. जिरायतीत राबणारे हात गळफासाऐवजी पाटाचे पाणी वळवतील, असे वाटले होते; पण त्यालाही वीज मिळत नाही. रोहित्र जळाले की, सगळ्या मेहनतीवर पाणी.

एवढे करून बाजार समितीत माल नेला तर भाव नाही. नाव शेतकऱ्यांचे अन् मालक दुसरेच. हमीभाव सोडा साधा भावही नाही. उद्योग तर कुठेच दिसत नाही. शिकायचे सवरायचे अन् ऊसतोड, बांधकामाची कामे करीत गाव सोडायचे, असा इथला तरुण. तरुण बाहेर गेलेल्या गावाचे भविष्य काय ते असणार? कोंबड्या कोंबल्यासारखी वाहनात भरून माणसे नेणारे मुकादम जागोजागी भेटतात. उद्योगपतींपेक्षा त्यांनाच मोठा भाव दिसतो इथे. शिक्षणाचे तर वाटोळेच. उच्चशिक्षणात एक दंत महाविद्यालय दिमाखाने मिरवतेय. अभियांत्रिकीची ओसाड इमारत, दुरवस्थेतील शासकीय शाळा अन् श्रीमंतीच्या सावलीत चालणाऱ्या इंग्रजी शाळा याला काय वैभव म्हणायचे?

पुढाऱ्यांची तर त-हाच वेगळी.  कुणी देशपातळीवर बिझी तर कुणाला जि.प.च्या तीन लाखांच्या कामातही रस. काय वाटेल बापूंना हे सारे ऐकून? सेवाभाव, सकारात्मकता हरवली या शहराची. औषधी, सुविधा अन् डॉक्टरांविना शासकीय रुग्णालयातील आर्त कुणाच्याच कानी कशी पडत नाही? जेमतेम दोनच मोठी तीर्थक्षेत्रे. त्या औंढा व नर्सीचाही विकास नाही. अवैध व्यवसाय अन् महिलांवरील अत्याचारही नित्याचाच. किती किती हे बोलायचे? जो माझा स्वभावच नाही. नाही पाहावत आणि बोलवत हे सारे. नागरिक म्हणून तुम्हालाच याचे काही वाटत नसेल, तर मी माकड तरी काय करणार? फार फार तर हा रिपोर्ट बापूंना सांगणार.  

रस्त्यांबाबत काय बोलावे?  
रस्त्यांचा विकास आमदार-खासदारांच्या तोंडून निघणाऱ्या आश्वासनांनीच पूर्ण झाला. प्रत्यक्षात खड्डे अन् पायाला ठेच हेच प्रारब्ध. प्रधानमंत्री ग्रामसडक आता मुख्यमंत्री ग्रामसडक झाली. काय फरक पडला त्यांचा त्यांनाच ठाऊक. खरंच, मुख्यामंत्र्यांचे नाव केले या रस्त्यांनी. 

( लेखक हे ‘लोकमत’चे  हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आहेत.)

Web Title: Gandhi Jayanti Special: I say, why is this district formed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.